पालिकांतील रोजंदारी कामगारांना हंगामी दर्जासाठी प्रयत्नशील : राणे

0
4

>> नगरपालिका प्रशासनाला प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन

राज्यातील विविध नगरपालिकांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना हंगामी दर्जा (टेम्पररी स्टेटस) देण्यासंबंधीचा प्रस्ताव नगरपालिका प्रशासनाला पाठवण्याचे आश्वासन काल नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांनी काल विधानसभेत दिले.

काल प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार दिगंबर कामत यांनी गेल्या 5 वर्षांपासून नगरपालिकांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या सेवेसाठी त्यांना हंगामी दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना राणे यांनी वरील आश्वासन दिले.

राज्यातील नगरपालिकांत गेल्या अनेक वर्षांपासून काही कामगार रोजंदारीवर काम करीत आहेत. सरकारला जर त्यांना सेवेत कायम करता येत नसेल, तर सरकारने त्यांना किमान सेवेत हंगामी दर्जा तरी द्यावा. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सेवेत कायम करण्याचे सभागृहात आश्वासन दिले होते, याची आठवण दिगंबर कामत यांनी सरकारला करून दिली.

आपण या रोजंदारीवरील कामगारांना सेवेत हंगामी दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवला, तर तो स्वीकारण्यात येईल की नाही, अशी शंकाही यावेळी राणे यांनी यावेळी व्यक्त केली. कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करता येणार नाही, अशा स्वरुपाचा एक आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सभागृहात स्पष्ट केले आहे, असेही राणेंनी नमूद केले.