पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांच्या भाजप फेरप्रवेशाचा निर्णय केंद्रीय नेत्यांच्या हाती

0
12

>> प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची स्पष्टोक्ती

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांना भाजपमध्ये फेरप्रवेश द्यावा की नाही, यासंबंधीचा निर्णय केंद्रातील नेतेचे घेणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल स्पष्ट केले. सद्य:स्थितीत हा निर्णय गोव्यातील भाजप नेते घेऊ शकत नाहीत. याविषयीचा निर्णय केंद्रीय नेतेच घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर हे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्यास इच्छुक असतील, तर त्यांना पक्षात प्रवेश देण्यात येईल का, या प्रश्नावर उत्तर देताना तानावडे यांनी काल ही प्रतिक्रिया दिली.
लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2022 ला भाजपला रामराम ठोकला होता. भाजपने मांद्रेतून उमेदवारी नाकारल्याने लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती, तर पणजीतून उमेदवारी न दिल्याने उत्पल पर्रीकर यांनी पक्षातून बाहेर पडणे पसंत केले होते. त्यानंतर दोघांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मांद्रे मतदारसंघातून भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवल्याने सोपटे यांचा पराभव झाला होता आणि त्यात मगोचे उमेदवार जीत आरोलकर हे विजयी ठरले होते. उत्पल पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवत भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना जोरदार टक्कर दिली होती. केवळ 800 मतांच्या फरकाने उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाला होता.