माजी मुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यावर भाजपच्या मांद्रे मंडळाचे अध्यक्ष, जिल्हा पंचायत निवडणुकीतील पराभूत उमेदवार व इतरांनी केलेल्या आरोपांची प्रदेश भाजपने गंभीर दखल घेतली असून भाजपच्या मांद्रे मंडळाचे अध्यक्ष व इतरांना भाजपच्या पणजी कार्यालयात बोलावून त्यांना योग्य समज काल दिली.
भाजपच्या मांद्रे मंडळाचे अध्यक्ष आणि इतरांनी भाजपच्या व्यासपीठावरून भाजपचे ज्येष्ठ नेते पार्सेकर यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. मांद्रे मंडळाचे अध्यक्ष व इतरांनी आपल्या चुकीची कबुली दिली असून यापुढे अशा प्रकारची चूक करू नये, अशी सूचना त्यांना देण्यात आल्याची माहिती तानावडे यांनी दिली.