>> मुख्यमंत्र्यांचा इशारा : तिसवाडीतील बैठकीत घेतला आढावा
वाढदिन व इतर प्रकारच्या पार्टीचे आयोजन करणार्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
तिसवाडी तालुक्यातील कोरोना विषाणू आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होेते. या बैठकीला महसूलमंत्री जेनिङ्गर मोन्सेरात, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार आन्तोनियो ङ्गर्नांडिस, ङ्ग्रांसिस सिल्वेरा, मुख्य सचिव परिमल राय, उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्रीमती आर. मेनका, उपजिल्हाधिकारी (तिसवाडी), आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
वाढदिन व इतर पार्ट्यांमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची सूचना करण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी ५० नागरिकांना एकत्र येण्यास मान्यता दिली जाणार आहे.
आमदार आणि सरकारी अधिकार्यांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी वॉट्सऍप ग्रुप तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व प्रकारची माहिती या ग्रुपवरून देण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पणजीचा दर्जा कायम राखा
उपजिल्हाधिकारी, आरोग्याधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी समन्वयाने कार्य करून कंटेनमेंट भागात तसेच तालुक्यातील इतर भागात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी धोरण तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. पणजी मतदारसंघ हा एक असा मतदारसंघ आहे, जिथे आत्तापर्यंत कोरोनाचे एकही प्रकरण सापडलेले नाही. पणजीचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्नरत रहा, असे ते म्हणाले.
आमदारांच्या उपचारासाठी एम्सची मदत
कोरोनाची लागण झालेल्या कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांच्यावरील वैद्यकीय उपचारासाठी एम्सच्या डॉक्टरांची मदत घेतली जात आहे. आमदार डायस यांची प्रकृती स्थिर आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.