11 राज्यांत धावणाऱ्या 9 वंदे भारत रेल्वेेंना दाखवला हिरवा झेंडा
देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याची अभूतपूर्व संधी चालून आली आहे. आजचा पायाभूत सुविधांचा वेग देशातील 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी जुळणारा आहे. आजच्या भारताला हेच हवे आहे. पायाभूत सुविधा ही आज भारताची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी 11 राज्यांमध्ये धावणाऱ्या 9 वंदे भारत रेलगाड्यांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत गाड्या आधीच देशभरात अनेक मार्गांवर धावत यामध्ये आणखी नऊ रेल्वे गांड्याची भर पडणार आहे. या गाड्यांमुळे अकरा राज्यांतील प्रवासाचा वेळ कमी होणार असून कनेक्टिव्हिटीही वाढेल असे मोदी म्हणाले.
या राज्यातून धावणार
या नऊ वंदे भारत रेल्वे 11 राज्यांमध्ये धावणार आहेत. त्यामध्ये राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला 11 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. त्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही उपस्थिती होती.
‘मन की बात’मध्ये
स्वच्छता अभियानचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या मन की बातमध्ये देशवासीयांना रविवार, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छतेचा मोठा कार्यक्रम होणार आहे. तुम्हीही वेळ काढून स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. 1 रोजी देशासाठी 1 तास द्या असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी काल 105 व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी, मला आलेली पत्रे आणि संदेश दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग आणि दुसरा विषय जी-20 चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. असे सांगून मोदींनी, जेव्हा चांद्रयान-3 चे लँडर चंद्रावर उतरणार होते, तेव्हा कोट्यवधी लोक वेगवेगळ्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यूट्यूब लाईव्ह चॅनलवर 80 लाखांहून अधिक लोकांनी हा ऐतिहासिक क्षण पाहिला. हा एक रेकॉर्ड असल्याची माहिती दिली.
गेल्या काही वर्षांत भारताविषयीचे आकर्षण खूप वाढले आहे आणि जी-20 च्या यशस्वी आयोजनाने जगभरातील लोकांची भारताविषयीचे आकर्षण आणखी वाढले आहे असे सांगून मोदींनी, इथली विविधता, विविध परंपरा, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि आपला वारसा या सर्वांची ओळख जी-20 साठी आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींना झाली. त्यामुळे येथील पर्यटनाचा आणखी विस्तार होईल असा विश्वास व्यक्त केला.
42 जागतिक वारसा स्थळे
पंतप्रधानांनी पुढे बोलताना, भारतातील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या आता 42 वर पोहोचली आहे. आपली जास्तीत जास्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे जागतिक वारसा स्थळे म्हणून ओळखली जावीत यासाठी भारताचा प्रयत्न असल्याचे सांगितले.