- ऍड. प्रदीप उमप
चित्रपट उद्योगासमोर सध्या चाचेगिरीचे अर्थात पायरसीचे मोठे आव्हान उभे आहे. पायरसीमुळे चित्रपट क्षेत्राशी संबंधित लोकांच्या उपजीविकेवरच संकट आले आहे. त्यामुळे या उद्योगातून पायरसीविरोधात आवाज उठत आहेत आणि एकीही दिसून येत आहे. परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये याविषयी कोणतीही जाणीवजागृती दिसत नाही.
चित्रपटांची डिजिटल चोरी करण्याची म्हणजेच पायरसीची समस्या आजकाल अक्राळविक्राळ रूप धारण करताना दिसत आहे. कोणत्याही नव्या चित्रपटाचे डिजिटल रूपांतर इंटरनेटच्या माध्यमातून त्वरित उपलब्ध व्हावे आणि लोकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट न पाहता तो स्मार्टङ्गोनवर, टीव्हीवर किंवा संगणकावरच बघावा, असा चाचेगिरी करणार्यांचा उद्देश असतो. अनेकदा अशा प्रकारे चोरी केलेल्या सामग्रीची गुणवत्ता इतकी निकृष्ट असते की, एकदा स्मार्टङ्गोनवर पाहिलेला चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात जाऊन पाहणे हा पैशांचा अपव्यय वाटू लागतो. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना कधीकधी नङ्गा तर दूरच; पण चित्रपटासाठी केलेला खर्चही भरून काढणे अशक्य होऊन बसते. निर्मात्यासह संपूर्ण संचाने केलेली मेहनत पाण्यात जाण्याची वेळ येते. भारतात चित्रपटांची चाचेगिरी हा नवीन विषय नाही. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस किंवा कधी-कधी तर काही तास आधीच चित्रपटाच्या लिंक इंटरनेटवर उपलब्ध होतात.
भारतात अनेक चित्रपट अशा प्रकारे प्रदर्शनापूर्वीच ‘लीक’ झाल्याची उदाहरणे घडली आहेत आणि अनेक चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वीच रसिकांनी स्मार्टङ्गोन किंवा अन्य माध्यमांवर पाहिले आहेत. अशा प्रकारे चोरलेली प्रिन्ट पाहणार्यांमध्ये सामान्य-असामान्य असा भेदभाव दिसत नाही. बॉलिवूडमधील जवळजवळ प्रत्येक बहुचर्चित चित्रपट पायरसीची शिकार ठरत आहे आणि हॉलिवूडचेही बहुचर्चित चित्रपट देशात प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांचीही चोरी होत आहे. डिजिटली चोरलेली कोणत्याही चित्रपटाची प्रिन्ट आपण मोबाइलवर, टीव्हीवर अथवा संगणकावर पाहिली नाही, असे सांगणारा चित्रपट रसिक भेटणे विरळाच! भारतात स्मार्टङ्गोन वापरकर्त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि इंटरनेटचा प्रसारही वेगाने वाढत आहे, त्यामुळे चित्रपटांमधील चाचेगिरीचा पूर्वी सामान्य वाटणारा आजार आता दुर्धर स्वरूप प्राप्त करताना दिसत आहे. अशा चोर्यांमुळे होणार्या नुकसानीसंदर्भातील जी माहिती समोर येत आहे, ती पाहता चित्रपट उद्योगाला दरवर्षी १६ हजार २४० कोटींचा ङ्गटका केवळ पायरसीमुळे बसत आहे.
पायरसीमुळे होणारे दुसरे मोठे नुकसान रोजगारांशी संबंधित आहे आणि वरवर पाहता या नुकसानीचा अंदाज लावता येत नाही. परंतु यासंदर्भात व्यक्त करण्यात येत असलेल्या अंदाजानुसार, चित्रपट आणि गीत-संगीत उद्योगातून आठ लाख रोजगार पायरसीमुळे नष्ट झाले आहेत. तसे पाहायला गेल्यास या चोरीविरुद्ध चित्रपट जगतातील लोक ङ्गार पूर्वीपासूनच आवाज उठवत आहेत. यासंदर्भात एखादा कठोर कायदा तयार करून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचीही मागणी चित्रपट उद्योगातून होत आहे. काही प्रसंगी चित्रपट उद्योगाला असे आश्वासनही दिले जाते की, पायरसीचे मूळ शोधण्याची व्यवस्था केली जाईल आणि स्रोत सापडताच कारवाई केली जाईल.
मुंबई नॅशनल म्युझियम ऑङ्ग इंडियन सिनेमाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी आले होते, तेव्हा त्यांनीही पायरसी म्हणजे चित्रपट निर्मात्याच्या मेहनतीचा अपमान असल्याचे सांगितले होते. तसेच सिनेमाटोग्राङ्गी ऍक्ट १९५२ मध्ये बदल करून तो अधिक सक्षम करण्याचे आश्वासन दिले होते. वस्तुतः नकली गीत, संगीत आणि मनोरंजनाचा व्यवसाय करणार्या कंपन्यांच्या बाबतीत धूसर परिस्थिती असल्यामुळेच या व्यवसायाला लगाम घालण्यात अद्याप यश आलेले नाही. आता तर परिस्थिती खूपच बिघडली आहे. आता इंटरनेटवरील शेकडो वेबसाइट्सवर गीत-संगीत किंवा चित्रपटाची पूर्ण प्रिन्ट डाऊनलोड केली जाते किंवा ती प्रिन्ट मामुली मोबदला घेऊन इतरांना दिली जाते.
चित्रपट आणि संगीत उद्योग आपल्या अवघ्या दहाच टक्के कलाकृतींपासून आर्थिक लाभ मिळवू शकत आहे आणि हे सर्व पायरसीचा राक्षस मोठा झाल्यामुळे घडत आहे. अन्य ९० टक्के कलाकृती पायरसीच्या जगतात खपवल्या जातात. पायरसीशी संबंधित आकडेवारीतून भारत हा पायरसीचा एक मोठा अड्डा बनल्याचे स्पष्ट झाले आहे.
पूर्वी पायरसीचा व्यवसाय करणार्यांना चित्रपटगृहात जाऊन संपूर्ण चित्रपटाची व्हिडिओग्राङ्गीद्वारे कॉपी करावी लागत असे. पायरसीच्या व्यवसायाशी जोडले गेलेले असंख्य लोक सामान्यतः चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहात छुपा कॅमेरा लावून तुकड्या-तुकड्याने चित्रपट चोरत असत. परंतु आता संपूर्ण चित्रपटाची चोरी एडिटिंग किंवा डबिंग लॅबमधून, त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेदरम्यानही आरामात करता येते. चित्रपटांची चोरी करणे हा डिजिटल युगात एका क्लिकचा मामला बनला आहे. इंटरनेटवर एक जरी स्रोत मिळाला, तरी तो क्लिक करून चित्रपट डाउनलोड करता येतो आणि त्याच्या अनेक डिजिटल आवृत्त्या करून विक्री करता येते. सुरक्षा आणि सावधगिरीसाठी केलेल्या उपाययोजना या स्तरावर बर्याच वेळा उपयुक्त ठरत नाहीत.
अमेरिकेतील ङ्गॉक्स प्रॉडक्शन हाउसच्या ‘ऍक्स-मॅन ओरिजिन्स वॉल्वराइन’ या चित्रपटाच्या सुरक्षिततेसाठी २००९ मध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. तरीही त्याची क्लिपिंग चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी इंटरनेटवर आली होती. निर्मात्या ङ्गॉक्स प्रॉडक्शन हाउसला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. परंतु तेथे एक सकारात्मक बाबही घडली होती. पायरसीची तक्रार प्राप्त झाल्याबरोबर एङ्गबीआय या तपास यंत्रणेने पायरसी करणार्यांना बेड्या ठोकल्या होत्या.
पायरसी हा चित्रपट उद्योगासमोरील जगण्या-मरण्याचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे हा उद्योग आपल्या स्तरावर यापासून बचावासाठी अनेक उपाययोजना करीत आहे. उदाहरणार्थ, भारतातील मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील मोशन पिक्चर्स असोसिएशनबरोबर अँटी-पायरसी करार केला. परंतु असे उपाय तोकडे पडत आहेत. स्वामित्वहक्काच्या चोरीसंदर्भातील कायदे जेव्हा कडक होतील आणि बौद्धिक संपदा चोरल्याविषयी तक्रार येताच दोषींना पकडून कठोरात कठोर शासन होईल, त्याचवेळी पायरसीच्या धोक्यापासून चित्रपट उद्योगाला खरा दिलासा मिळेल. पायरसीमुळे चित्रपट क्षेत्राशी संबंधित लोकांच्या उपजीविकेवरच संकट आले आहे. त्यामुळे या उद्योगातून पायरसीविरोधात आवाज उठत आहेत आणि एकीही दिसून येत आहे. परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये याविषयी जाणीवजागृती दिसत नाही. पायरसीमुळे अनेक चित्रपट ङ्गुकटात बघायला मिळत असल्यामुळे ही स्थिती आहे. यापुढील काळात पायरसीविरोधी मोहिमेत सामान्य जनतेला सामील करून घेण्याची आत्यंतिक गरज त्यामुळेच निर्माण झाली आहे. लोकांनी तत्कालीन ङ्गायद्यासाठी पायरेटेड चित्रपट पाहू नयेत आणि चित्रपटसृष्टीच्या व्यापक हितासाठी केवळ चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट पाहण्याची मानसिकता तयार व्हावी, अशी वातावरणनिर्मिती होणे आवश्यक आहे. चित्रपट उद्योगाकडून अर्थव्यवस्थेला मोठा महसूल मिळतो. त्यामुळेच सरकारी यंत्रणांनीही उदासीनता सोडून या संकटातून मार्ग काढायला हवा. पायरसी ही कलावंतांशी केलेली प्रतारणा ठरते. त्यामुळेही ती रोखलीच पाहिजे.