पाण्यासाठी दाहीदिशा

0
30

भविष्यात जगात पाण्यावरून युद्धे होतील, असे भाकीत एका पर्यावरणतज्ज्ञाने काही वर्षांपूर्वी व्यक्त केले होते. खरोखरच पाणी ही किती जीवनावश्यक बाब आहे आणि पाण्याला जीवन का म्हणतात याचा प्रत्यय प्रत्येक उन्हाळ्यात येत असतो. यंदा तर उन्हाळ्याला खरी सुरूवात होण्यापूर्वीच बंंगळुरूसारख्या शहरामध्ये जी भीषण पाणीटंचाई उद्भवली, त्यातून नैसर्गिक गोड पाण्याचे कमी होत चाललेले स्रोत, पाण्याची वाढती गरज आणि जलप्रदूषणासारख्या समस्यांकडे लक्ष वेधले गेले. अर्थात, एखाद्या शहराला भीषण पाणीटंचाईने ग्रासण्याची ही काही पहिलीच घटना नव्हे, परंतु ज्या शहराचे आजवर उद्यानांचे शहर म्हणून कोडकौतुक केले जायचे, अशी ही भारताची माहिती तंत्रज्ञानाची राजधानी पाण्याच्या एवढ्या गंभीर समस्येने त्रस्त झालेली पाहणे हे खरोखरीच धक्कादायक होते. आपल्या देशामध्ये विशेषतः दक्षिण भारतामध्ये भरपूर पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी पावसामुळे पश्चिमेकडील भागामध्ये तर पाण्याची ददात नसते. मात्र, पावसाच्या ह्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची पूर्ण वानवा असल्याने आणि मिळणाऱ्या पाण्याचा दुरुपयोग करण्याकडेच वाढता कल असल्याने अशा प्रकारची समस्या उद्भवते. बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत असताना देखील काही लोक आपली वाहने नळाच्या शुद्ध केलेल्या पाण्याने धुताना आढळले व त्यांना त्यासाठी नंतर दंड देखील करण्यात आला. अशा प्रकारची बेजबाबदार वृत्ती हीच ह्या समस्येच्या मुळाशी दिसते. बंगळुरूतील अनेक उच्चभ्रू निवासी संकुलांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जवळच्याच तामीळनाडूच्या हद्दीत येणाऱ्या गावांतील पाणी आणूून आपली तहान भागवली होती. परंतु बंगळुरूची पाणीटंचाईची समस्या ही केवळ प्रातिनिधिक मानावी लागेल. देशातील महानगरांमध्ये भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांची ही नांदी मानली गेली आणि त्या समस्येवर मात करण्यासाठी आतापासूनच पावले उचलली गेली तरच आपल्याला अशा संकटाचा सामना करावा लागणार नाही. आपल्या निसर्गसंपन्न मानल्या जाणाऱ्या गोव्यामध्ये देखील उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न बिकट बनत असतो. गेल्या महिन्यात जलसंसाधनमंत्र्यांनी राज्यातील धरणसाठ्यांमध्ये पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचा दावा करून ही शक्यता जरी फेटाळून लावली, तरी येत्या महिन्याभरात खरे चित्र समोर येऊ लागेल. आपण ज्यांना प्रमुख नद्या म्हणतो त्या खरेतर समुद्राला मिळणाऱ्या खाड्या आहेत. त्यामुळे भरती ओहटीच्या चक्रागणिक त्यात खारे पाणी भरणे ओसरणे ही प्रक्रिया निरंतर चालू असते. मात्र हे क्षारयुक्त पाणी वरवर चालले आहे. गोव्याच्या अंतर्भागामध्ये पूर्वी पाण्याचे समृद्ध स्रोत होते, परंतु खाण व्यवसायाने त्यांची वाताहत केली. समुद्रसपाटीपेक्षाही खोल खड्डे खोदून खाणकाम झाल्याने आजूबाजूच्या गावांतील पाण्याची पातळी खालावून तळ दिसू लागणे हे नेहमीचे झाले आहे. त्यावर उपाय म्हणून खाणींचे खंदक पावसाच्या पाण्याने भरून ठेवले जायचे. मात्र, पावसाळ्यात असे खंदक फुटून तो सगळा गाळ शेतीत शिरून शेतीची विल्हेवाट लावली जाण्याचे प्रकारही यापूर्वी घडले. गावोगावच्या विहिरी, मंदिरांसमोरच्या सुंदर तळ्या, गावचे तलाव, ओहळ ह्या कशाचीही काळजी आपण घेतली नाही. परिणामी हे जलस्रोत एक तर नष्ट झाले नाही तर प्रदूषित झाले. त्यामुळे जे मोजके स्रोत आहेत, त्याच्या साठवलेल्या पाण्यावर गोव्याची जनता आज नळाच्या पाण्यासाठी अवलंबून आहे. आज गोव्यात एकही असे शहर नाही की जेथील निवासी संकुलांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागत नाहीत. मोठमोठ्या हॉटेल आणि रेस्तराँमध्ये देखील टँकरमधून आणलेले पाणीच वापरले जात असते. आपल्याला अनेकदा याची जाणीवही नसते. खाणींमुळे खालावलेली भूजल पातळी, अनास्थेमुळे आणि वाढत्या शहरीकरणाच्या आणि कथित विकासाच्या रेट्यात नष्ट झालेले पारंपरिक जलस्रोत यामुळे पाणी ही एक महत्त्वाची समस्या बनून राहिली आहे. आपल्याकडे मुबलक पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला जमिनीत जिरवण्यासाठी त्याच्या पुनर्भरणाच्या योजनांचे ढोल नेहमीच पिटले जातात. नव्या निवासी संकुलांना असे प्रकल्प सक्तीचे करण्याचीही बात गेली अनेक वर्षे केली जात आली आहे, परंतु प्रत्यक्षात धो धो कोसळणाऱ्या पावसाचे पाणी बघता बघता वाहून जाते आणि दर उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची पाळी जनतेवर येते. निवडणुकांची धामधूम आटोपताच, पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे हे ध्यानी घेऊन आणि बंगळुरू शहरात यंदा उद्भवलेली समस्या डोळ्यांपुढे ठेवून येत्या पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता त्यातून आपली भूजल पातळी कशी वाढवता येईल ह्यादृष्टीने सरकारने काही उपाययोजना करावीच लागेल.