पीर्ण, अस्नोडा व आजूबाजूच्या परिसरातील शेत जमिनीसाठी निर्माण होत असलेली पाण्याची समस्या सोडविण्याच्या हेतूने जलस्त्रोत खात्याने साळ नदीतील ११० एमएलडी पाणी आमठाणे जलकुंडाला सोडण्याची यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला असून हा प्रकल्प एप्रिल २०१५ पर्यंत पूर्ण करण्याची तयारी सरकारने ठेवली आहे.आमठाणेचे पाणी जलप्रक्रिया प्रकल्पातही सोडणे शक्य होईल त्यामुळे प्रक्रिया केलेले वरील पाणी बार्देस तालुक्यात सोडण्यासाठी मदत होईल. तिळारी प्रकल्प देखभालीसाठी बंद ठेवावा लागतो त्यामुळे दरम्यानच्या काळात अस्नोडा पाणी प्रकल्पात पाण्याची समस्या निर्माण होते. त्याचा परिणाम म्हणून बार्देस तालुक्याला मर्यादित पाणी पुरवठा करावा लागतो.
वरील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तिळारी प्रकल्प बंद ठेवला तरी पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. त्यामुळेच सरकारने वरील प्रकल्प उभारण्याचे ठराविले आहे.
सध्याच्या स्थितीत साळ नदीतील फक्त २५ एमएलडी पाणी आमठाणे जलकुंडात सोडले जाते. या नव्या प्रकल्पासाठी तीन शक्तीशाली पंप साळ भागात बसविण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.