>> ६९ जणांनी घेतले अर्ज मागे
येत्या २१ मार्च रोजी होणार्या म्हापसा, मुरगांव, मडगाव, केपे व सांगे या नगरपालिका निवडणुकांच्या रिंगणात एकूण ३६६ एवढे उमेदवार शिल्लक राहिले असल्याची माहिती काल राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने दिली. काल अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
केपे नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १, ३ व ६ मध्ये प्रत्येकी केवळ एकच उमेदवार रिंगणात शिल्लक राहिल्याने त्या तिन्ही प्रभागांतील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. हे तिन्ही उमेदवार भाजपचे आमदार बाबू कवळेकर यांचा पाठिंबा लाभलेले उमेदवार आहेत.
काल म्हापसा नगरपालिका निवडणूक रिंगणातून १७ जणांनी, मुरगांव २१ जणांनी, मडगाव २१ उमेदवारांनी, केपे ८ उमेदवारांनी तर सांगे २ उमेदवारानी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता म्हापसा निवडणूक रिंगणात ८०, मुरगाव ११२, मडगांव ९०, केपे ४३ तर सांगे निवडणूक रिंगणात ४१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
प्रभाग फेररचनेचा आदेश
न्यायालयाकडून राखीव
सर्वोच्च न्यायालयाने काल मुरगाव, मडगाव, म्हापसा, केपे व सांगे या पाच नगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रभाग आरक्षण व प्रभाग फेररचनेसंबंधीचा आदेश राखून ठेवला. पाच पालिकांच्या आरक्षणाची अधिसूचना रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशास गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
मंगळवारी वरील याचिकेवरील सुनावणी होणार असल्याने सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी काय निवाडा देते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
केप्यातून तिघांची
बिनविरोध निवड
केपे नगरपालिका निवडणुकीत काल भाजपच्या तीन उमेदवारांनी बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक १ मधून चेतन हळदणकर, प्रभाग क्र्रमांक ३ मधून सुचिता शिरवईकर व प्रभाग क्रमांक ६ मधून माजी नगराध्यक्ष दयेश नाईक यांची बिनविरोध निवड झाली.