राज्यातील पाच नगरपालिका क्षेत्रातील प्रभागाच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. डिचोली, कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा, केपे आणि काणकोण या पाच नगरपालिका क्षेत्रातील प्रभागाच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
डिचोली आणि कुंकळ्ळी या दोन्ही पालिकांमध्ये प्रत्येकी १२ प्रभाग असून इथे आणखी दोन प्रभाग वाढवून १४ केले जाणार आहेत.
कुडचडे-काकोडा नगरपालिकेमध्ये १४ प्रभाग आहेत. या नगरपालिका क्षेत्रात आणखी एक प्रभाग तयार करून प्रभागांची एकूण संख्या १५ केली जाणार आहे.
केपे नगरपालिकेमध्ये ११ प्रभागात आहेत. याठिकाणी आणखी २ प्रभाग वाढवून प्रभागांची एकूण संख्या १३ केली जाणार आहे. काणकोण नगरपालिकेत १० प्रभाग असून तिथे आणखी २ प्रभाग तयार करून एकूण संख्या १२ केली जाणार आहे. संबंधित मामलेदारांना प्रभाग वाढविण्याची प्रक्रिया येत्या १२ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला नगरपालिका निवडणूक घेण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे.