पाच दुर्घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू

0
4

>> कळंगुट समुद्रात बोट उलटली; एका पर्यटकाचा बुडून मृत्यू; 12 पर्यटकांना वाचवले

काल नाताळदिनी राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या पाच दुर्घटनांमध्ये एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कळंगुट किनाऱ्यावरून पर्यटकाला जलसफरीसाठी घेऊन निघालेली बोट समुद्रात बुडाल्याने झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील सूर्यकांत पोफळकर (45, रा. खेड) हा पर्यटक बुडून मृत्यूमुखी पावला. या दुर्घटनेतून अन्य 12 जणांना वाचवण्यात आले. काल दिवसभरात राज्यात झालेल्या अन्य चार दुर्घटनांत चार जण ठार झाले. पाटवळ-सत्तरी येथे शिकारीसाठी गेलेला 22 वर्षीय समर खान हा बंदुकीची गोळी लागल्याने ठार झाला. पारोडा-केपे येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात रोशन मुजावर (41, रा. शिरवई, केपे) हा ठार झाला. चौथ्या घटनेत वेलकास-सावईवेरे येथे श्री अनंत देवस्थानाच्या तळीत बुडून तुळशीदास दत्ता पालकर (42, रा. वेलकास-सावईवेरे) यांचा मृत्यू झाला. याशिवाय काल मध्यरात्री भाटी-गोवा वेल्हा येथे कारने संरक्षक भिंतीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक ठार झाला.

नाताळच्या सुट्टीनिमित्त पोफळकर कुटुंबीय गोव्यात आले होते. काल सकाळी पावणे अकराच्या सुमारास बारा पर्यटकांना सोबत घेऊन एक बोट जलसफरीसाठी समुद्रात उतरली. सुमारे 100 मीटर पुढे गेल्यानंतर बोटीचे इंजिन रेतीत अडकल्याने अचानक बंद पडले व लाटेची धडक बसल्याने बोट पाण्यात कलंडली. त्याबरोबर बोटीतील सर्व पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. सर्व प्रवाशांना बोटचालकाने लाईफ जॅकेट दिले होते; मात्र सूर्यकांत पोफळकर यांचा बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखत पाण्यात बुडणाऱ्या इतर 12 पर्यटकांना वाचवले. 8 पर्यटकांना कांदोळी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यातील एका मुलासह पाच जणांना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. यावेळी कळंगुट पोलीस स्थानकाच्या पोलिसांबरोबरच, पर्यटक पोलीस, किनारपट्टी पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेतली अणि मदतकार्यात सहकार्य केले.

ओव्हरटेकचा आततायीपणा दुसऱ्याच्या जीवावर बेतला
केपे : दुचाकीचालकाचा ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा आततायीपणा समोरून येणाऱ्या अन्य एका दुचाकीचालकाच्या जीवावर बेतला. पारोडा-केपे येथे काल सकाळी पावणेनऊच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात रोशन मुजावर (41, रा. शिरवई-केपे) यांचा मृत्यू झाला.
सविस्तर माहितीनुसार, दुचाकीचालक रोशन मुजावर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत वेगाने आलेल्या मोहम्मद सर्फराज याच्या दुचाकीची (क्र. जीए-08-एपी-1165) त्यांच्या दुचाकीला बसली. त्यात रोशन मुजावर हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना लगेचच उपचारासाठी लगतच्या इस्पितळात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुलांच्या डोळ्यादेखत तळीत बुडून वडिलांचा मृत्यू

>> हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अंदाज

सावईवेरे येथील अनंत देवस्थानच्या तळीत बुडून तुळशीदास दत्ता पालकर (42, रा. वेलकास-सावईवेरे) यांचा काल दुपारी मृत्यू झाला. तुळशीदास हे आपल्या मुलांना सदर तळीत पोहायला शिकवत होते. त्यावेळी मुलांच्या डोळ्यादेखत ही दुर्घटना घडली. दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी दुपारी तुळशीदास पालकर हे आपल्या दोन मुलांना तळीत पोहण्याचे धडे देत होते. तळीत पोहल्यानंतर त्यांची दोन्ही मुले तळीतून बाहेर आली. त्यावेळी अचानक पाण्यात असलेले आपला वडील बुडत असल्याचे पाहून मुलांनी मदतीसाठी हाका मारून स्थानिक लोकांना बोलावून घेतले. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तुळशीदास यांना बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; पण तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पाण्यात असलेल्या तुळशीदास पालकर यांना हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचा मृत्यू आल्याचा संशय व्यक्त केला जात
आहे.
गुरुवारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. म्हार्दोळ पोलिसानी घटनेचा पंचनामा केला आहे.

गोवा वेल्हातील स्वयंअपघात
कारचालक ठार; 1 जण जखमी

भाटी-गोवा वेल्हा येथे कारने संरक्षक भिंतीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक ठार झाला, तर एक जण जखमी झाला. हा अपघात काल मध्यरात्री झाला. घरी जात असताना वाटेत चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती एका घराच्या संरक्षक भिंतीला धडक दिली. या अपघातात फ्रान्सिस ब्रांगाझा (43) याचा मृत्यू झाला. आगशी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बांबोळी येथील गोमेकॉमध्ये पाठविला. या प्रकरणी उपनिरीक्षक शुभम कोरगावकर तपास करीत आहेत.

शिकारीवेळी बंदुकीची गोळी लागून 22 वर्षीय तरुण ठार

>> पाटवळ येथील घटना; दोघे संशयित ताब्यात

पाटवळ-सत्तरी येथील जंगलात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी गेलेल्या तिघांपैकी एकाला गोळी लागून त्याचा मृत्यू होण्याची घटना काल मध्यरात्री 2 च्या सुमारास घडली. या घटनेत समद युनूस खान (22, रा. नाणूस) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले असून, चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे

सविस्तर माहितीनुसार, बाबू उमर संगर (38 रा. चिंचमळ-म्हाऊस), गौस नूर अहमद (28, रा. चिंचमळ-म्हाऊस) आणि समद युनूस खान
हे तिघेजण मंगळवारी रात्री वन्य शिकारीसाठी पाटवळ भागामध्ये गेले होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास समद शेख या तरुणाला अचानकपणे गोळी लागली. जखमी समद खान यांना वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. समद खान याचा मृतदेह गोमेकॉमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

याबाबतची तक्रार अजिज अहमद खान (रा. भुईपाल भेडशीवाडा होंडा) यांनी बुधवारी सकाळी वाळपई पोलीस स्थानकात नोंदवली. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर वाळपई पोलिसांनी तपास कार्य सुरू केले. यावेळी शिकारीत सहभागी असलेल्या दोघा जणांना पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले व त्यांची चौकशी सुरू केली. वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्याबरोबरच उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी तपासकामात सहभाग घेतला. काल दुपारी पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी वाळपईत दाखल होत एकूण प्रकरणाच्या तपासाची स्थिती जाणून घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांवर कारवाई करण्यात येणार असून, कुणालाही सोडले जाणार नसल्याचे कौशल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काल दुपारी फॉरेन्सिक तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून अनेक नमुने गोळा केले. गोळी झाडण्यासाठी वापरलेली बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अन्य महत्त्वाच्या वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार दोन्ही संशयितांना चौकशीसाठी चार दिवसांची पोलीस कोठडी वाळपई प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिली आहे.