पाच दहशतवाद्यांना काश्मिरात कंठस्नान

0
85

सुरक्षा दलांची यशस्वी मोहीम
भारतीय सुरक्षा दलाने हाती घेतलेल्या एका मोहिमेत कित्येक तासांच्या धुम:श्‍चक्रीनंतर काल दक्षिण काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात जैश-ए-महम्मद व हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनांच्या ५ दशहतवाद्यांना ठार केले. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक अब्दुल गनी मीर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या दहशतवाद्यांजवळील ३ एके रायफली, एक एसएलआर व पिस्तुल या सह बराच दारुगोळा सुरक्षा दलांनी ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. राज्य पोलीस, राष्ट्रीय रायफल्स व सीआरपीएफ यांचीही संयुक्त मोहीम पूर्ण यशस्वी ठरल्याचा दावा मीर यानी केला. वरील भागात दहशतवादी दडले असल्याची नेमकी माहिती मिळाल्यानंतर या मोहिमेची आखणी करण्यात आली होती. दडून राहिलेल्या दहशतवाद्यांना या मोहिमेची कल्पना आल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला व पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा दलांनी सर्व पळवाटांची नाकाबंदी केली. व त्यांच्या हल्ल्यास जोरदार प्रत्त्युत्तर दिले. त्यात ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात दलास यश आले. त्यांची ओळख पटली नसून शोध मोहीम अजूनही सुरू असल्याचे मीर यानी सांगितले. या यशस्वी मोहिमेमुळे दहशतवाद्यांचे विध्वंसक कारवायांच्या मनसुब्यांना जोरदार हादरा बसल्याचे ते म्हणाले.
एका दिवसापूर्वीच सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीरमधील सोपोर भागात एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले होते.