>> गोमेकॉत तिघांवर उपचार सुरू
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित आणखीन १ रुग्णाला दाखल करण्यात आला आहे. कोरोना खास वॉर्डात सध्या तिघांवर उपचार सुरू आहेत. खास वॉर्डातील ५ जणांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
कोरोना संशयित ८ रूग्णांच्या वैद्यकीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २१४ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. आरोग्य खात्याकडे घरी निरीक्षणासाठी ९५ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. कोरोना संशयित ३ रुग्णांना अलग ठेवण्यात आले आहे. मडगाव येथील ईएसआय इस्पितळ आणि टीबी इस्पितळामध्ये आत्तापर्यत कोरोना संशयित ७ रुग्णांना ठेवण्यात आले आहेत. कोरोना संशयित ५ संशयिताचे अहवाल काल प्राप्त झाले असून सर्व अहवाल नकारात्मक आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
माजी मंत्री मिकी पाशको यांना घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. कर्नाटकातील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलेच्या विमानात माजी मंत्री पाशको हे एक सहप्रवासी होते. त्यांना इस्पितळात दाखल करण्याचा प्रयत्न फसल्याने अखेर पाशको यांना घरीच निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.