8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश
ओदिशात विधानसभेच्या 35 जागांसाठी मतदान
देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार 20 रोजी मतदान होत आहे. आज पाचव्या टप्प्यासाठी 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, ओडिशातील 5, झारखंडमधील 3 आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. ओदिशामधील 35 विधानसभा मतदारसंघांसाठीदेखील आज मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आज होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण करून भारतीय निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. या सोबतच, ओदिशा विधानसभेच्या 35 विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होणार आहे.
आज लोकसभेच्या 49 जागांसाठी 8.95 कोटी मतदार मतदान करणार असून 94 हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे.
मतदानासाठी आवाहन
मतदारांनी अधिक संख्येने घराबाहेर पडून मतदान केंद्रांवर जावे तसेच जबाबदारीने आणि अभिमानाने मतदान करावे असे आवाहन निवडणूक आयोगाने नागरिकांना केले आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांदरम्यान, मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मदत घेतली आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आत्तापर्यंत मतदान केंद्रांवर सुमारे 66.95% मतदान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये देशातील सुमारे 451 दशलक्ष लोकांनी मतदान केले असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
8 राज्यांत मतदान
आज पाचव्या टप्प्यासाठी ज्या 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे त्यामध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत शहरी मतदारांनी मतदानासाठी उदासीनता दाखवली होती अशा मुंबई, ठाणे, लखनौसारख्या शहरांमध्ये या टप्प्यात मतदान होणार आहे. उर्वरित 3 टप्प्यांतील मतदान 1 जूनपर्यंत होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच 379 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले.
दिग्गजांची कसोटी
लोकसभा निवडणुकीच्या या पाचव्या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यामध्ये राहुल गांधी, स्मृती इराणी, राजनाथ सिंह यांच्या लढतीकडे देशाचे लक्ष आहे. महाराष्ट्रातही अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत कैद होईल. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे कल्याण मतदारसंघांचा समावेश आहे. तर मुंबईतील सर्व सहा ठिकाणच्या लढतीमध्ये अरविंद सावंत, यामिनी जाधव, उज्वल निकम, वर्षा गायकवाड यांचे भवितव्य आजच्या मतदानातून ठरणार आहे.
शंभरीचे 24 हजार मतदार
पाचव्या टप्प्याच्या मतदानात 85 वर्षांहून अधिक वयाचे 7.81 लाख मतदार, 100 वर्षांहून अधिक वयाचे 24,792 मतदार तर 7.03 लाख दिव्यांग मतदार असून सुविधेसाठी त्यांना घरून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. घरून मतदान करण्याच्या पर्यायी व्यवस्थेची याआधीच मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे