पाकिस्तान युद्धाचे साहस करील काय?

0
108

– दत्ता भि. नाईक
गेल्या ऑगस्ट महिन्यात ‘हुर्रियत’ या जम्मू-काश्मीरमधील विभाजनवादी संघटनेचा नेता शबीर शहा याने दिल्लीत पाकिस्तानी उच्चायुक्तांची भेट घेतली. पाकिस्तानी उच्चायुक्त बशीर अली यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याची सारवासारव केली असली तरी एका देशविरोधी काम करणार्‍या संघटनेच्या प्रमुखाने परदेशी राजदूताला भेटणे व तेही या कारवायांना खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानसारख्या राष्ट्राच्या उच्चायुक्ताला, ही साधी गोष्ट नव्हती. याचा परिणाम म्हणून भारत सरकारने सीमावादावरची पाकिस्तानशी जी काही चालू असलेली बोलणी होती, ती स्थगित केली. शबीर शहा – बशीर अली ही भेट पूर्वनियोजित होती की ती सहजपणे दोन मित्रांची गळाभेट होती हे समजणे कठीण आहे. परंतु या भेटीची गंभीर दखल घेणे भारत सरकारला क्रमप्राप्त होते. याच काळात पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचा क्रिकेट खेळाडू इम्रान खान यांचा तेहरिक-ए-इन्साफ व डॉ. मोहम्मद तहीर उल् कादरी यांचा तहीर-उल-कादरी या दोन पक्षांनी राजधानी इस्लामाबादच्या दिशेने लॉंग मार्चचे आयोजन केले. पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता उत्पन्न झाली की भारताच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणे हा पाकिस्तानचा नेहमीचा शिरस्ता आहे आणि त्या दिशेने पाकिस्तानी सेनादलांची पावले पडू लागली आहेत.
नागरी वस्त्यांवर गोळीबार
पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर गोळीबार करून व काही ठिकाणी भुयारे खोदून आतंकवाद्यांना भारतीय हद्दीत घुसण्यास मदत करणे ही पाकिस्तानी लष्कराकडून केली जाणारी नित्याची बाब आहे. अशा प्रकारच्या बातम्या आल्यास आपल्याला विशेष काही वाटत नाही, किंबहुना तशा बातम्या नसल्यास आपल्याला काहीतरी चुकल्यासारखे वाटते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मात्र सीमेवरील गोळीबाराचे स्वरूप बदलले. परिणामस्वरूप प्रथम गृहमंत्री श्री. राजनाथ सिंह व तद्नंतर संरक्षणमंत्री श्री. अरुण जेटली यांनी आम्ही पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ असे ठणकावून सांगितले.
दि. ४ ऑक्टोबर रोजी पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेपलीकडील पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय हद्दीतील पुंछ विभागातील गावांतील नागरिकांवर गोळीबार केला. दि. ६ ऑक्टोबर रोजी आलेल्या वार्तेनुसार भारतीय बाजूच्या जम्मू क्षेत्रातील बिंबरगल्ली गावातील वस्तीवर आदळलेल्या गोळ्यांमुळे पाच नागरिक मरण पावले तर चौतीसजण जखमी झाले. भारतीय सीमा सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरादाखल तेवढ्याच तीव्रतेने गोळीबार केल्याने पाकिस्तानी सेनेचा हा आक्रमक पवित्रा थोडासा थांबलेला दिसतो. परंतु वातावरण निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरवर्षी ईद-उल-झुआच्या दिवशी भारत-पाक सीमेवर मिठाईचे आदान-प्रदान होते, पण यंदा तसे काहीही घडले नाही.
सीमारेषेवरील पीडित गावांना भेट देण्यासाठी गेलेल्या निरनिराळ्या वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींनी रक्ताने माखलेल्या चादरी, भंगलेली घरांची छप्परे, गोळीबारामुळे भोके पडलेल्या खिडक्या, तसेच इतस्ततः पडलेले उखळी तोफांच्या गोळ्यांचे तुकडे पाहिल्याचे वृत्त आलेले आहे. पुनश्‍च गोळीबार होण्याच्या भीतीने नागरी वस्तीतील लोक सध्या बर्‍याच मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असल्याचेही तेथे पाहणीसाठी गेलेल्यांच्या लक्षात आले. जखमींना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेणार्‍या पथकाचे प्रमुख देवेंदरसिंह यांच्या मते घरांच्या पडझडीबरोबरच गोळीबार व तोफगोळ्यांच्या मार्‍यामुळे बर्‍याच प्रमाणात पशुधनही मृत्युमुखी पडले आहे. गोळीबार अशा प्रकारे केलेला आहे की ज्यामुळे जवळच उभे असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना यातील एकही गोळी लागलेली नाही.
अंतर्गत समस्यांमुळे हैराण
गृहमंत्री राजनाथ सिंह व संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांनी पाकिस्तान जे काही करते ते त्या देशाच्याच हिताचे नाही अशी प्रतिक्रिया दिली, तर कॉंग्रेसचे सलमान खुर्शीद यांनी या प्रकारच्या घटना ईदच्याच दिवशी घडल्याने दुःख व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला काश्मीर सोडून काहीच सुचत नाही. त्याना जिथे तिथे काश्मीर विषय पुढे करण्याची सवय झालेली आहे अशी प्रतिक्रिया दिली. हेच ओमर अब्दुल्ला दोन महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरला लागू असलेले ३७० वे कलम हटवल्यास जम्मू-काश्मीर भारतात राहणार नाही असे म्हणाले होते. पाकिस्तान हे इस्लामच्या नावावर सर्वत्र दहशत माजवणार्‍या आतंकी गटांचे आश्रयस्थान बनलेले आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महम्मद, अल् कायदा, हक्कानी नेटवर्क, दाऊद इब्राहिम व आता नव्याने सुरू झालेल्या इस्लामिक स्टेट या सर्व स्वतःहून शांततेला पारखे झालेल्या गट व व्यक्तींचे सुखरूपपणे वास्तव्य करण्याचे ठिकाण बनलेले आहे हे सर्व चालू असले तरी पाकिस्तानमध्ये अंतर्गत झगडे चालू आहेतच. बलूचीस्तान व सिंधेचा स्वातंत्र्यलढा चालू आहेच, पण उत्तर वझिरीस्तान येथे पाकिस्तान सरकारचे काहीच चालत नाही. उत्तर वझिरीस्तान हा भाग पाक-अफगाण सीमेवर आहे. इथे अरब, मध्य आशिया, पंजाब येथील आतंकवादी, स्थानिक लढवय्ये गट व तालिबान यांचा कधी आपसात तर कधी पाकिस्तानशी लढण्याचा कार्यक्रम जारी असतो. इथून पाकिस्तानविरुद्ध सर्व गटांनी मिळून युद्ध पुकारलेले आहे व ते पाकिस्तानी सेनेच्या नियंत्रणाबाहेर आहे. ही अमेरिकेच्या पुढाकाराने अफगाणिस्तानमध्ये वावरणार्‍या नाटो राष्ट्रांच्या सैन्यदलांसाठी डोकेदुखी आहे, म्हणूनच येथे अधूनमधून अमेरिकेकडून ड्रोन हल्ले केले जातात.
लष्करे तोयबाचा म्होरक्या हाफिस सईद हा पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरतो यासंबंधी पाकिस्तानी उच्चायुक्ताला विचारले असता तो पाकिस्तानचा नागरिक असल्याने देशात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे अशी मखलाशी केली जाते. सध्या त्याच्यावर चालू असलेला खटला व चौकशी हेसुद्धा जगासमोर स्वतःची प्रतिमा उजळ ठेवण्यासाठी केलेले नाटक आहे.
सिव्हिल नव्हे क्रिमिनल वॉर
पाकिस्तानने आतापर्यंत भारताशी चार वेळा युद्ध केले. प्रत्येक वेळेला पाकिस्तानच्या नशिबी पराभव आलेला आहे. इतके होऊनही भारतविरोधी जागतिक शक्तीमुळे वा अमेरिकेने पुरवलेल्या कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वासामुळे असेल पाकिस्तान अजूनही तग धरून आहे. शेवटचे कारगिल युद्ध सोडल्यास प्रत्येक वेळेला युद्ध जिंकूनही भारत सरकारने पाकिस्तानशी पराभुतासारखे करार केले. त्यामुळे लढाई नेमकी कुणाविरुद्ध होती याचाच उलगडा होईनासा झाला.
नेहरू- माऊंटबॅटन- जिना कराराने सिमला येथील चर्चेनंतर पाकिस्तानचा जन्म झाला. देशाचे विभाजन केले नाही तर देशात ‘सिव्हिल वॉर’ होईल अशी भीती घातली गेली आणि पाकिस्तान नावाचे कायमचे ‘क्रिमिनल वॉर’ जन्माला घातले. जिना जनतेची अदलाबदल करायला तयार होते, पण माऊंटबॅटन यांनी त्यांना चूप केले. अखेरीस भारताचे विभाजन करणार्‍या माऊंटबॅटन यांची इंग्लंडमधून फुटून निघण्याची चळवळ चालवणार्‍या आयरिश रिपब्लिकन बंडखोरांकडून हत्या केली गेली.
पाकिस्तानचे नागरिक असलेले ‘न्यूज विक पाकिस्तान’चे सल्लागार संपादक पत्रकार खलील अहमद म्हणतात, ‘जगातील सर्व मुसलमानांसारखा खुज्या राजकीय नेत्यांच्या नादी लागण्याचा रोग पाकिस्तानलाही लागलेला आहे व मीही त्याला अपवाद नाही. काहीही पडले तर त्याला इस्राएल व इंडिया यांना जबाबदार धरणे ही आमची नित्याचीच बाब आहे.’
राष्ट्र नव्हे, युद्धराज्य
गेल्या वर्षी अकबरुद्दिन आवैसी या खासदाराने ‘पंधरा मिनिटे पोलिस व सेना काढून घ्या, मग भारतातील पंचवीस कोटी मुसलमान पंचाहत्तर कोटी हिंदूंना संपवतील’ अशा आशयाचे उद्गार काढले होते. हल्लीच हिंदी भाषेतून प्रकाशित केलेल्या एका भित्तीपत्रकात त्याचाच मोठा भाऊ अससुद्दिन औवेसी याच्या छायाचित्रासह त्याचा संदेश देण्यात आलेला आहे. त्यात तो म्हणतो- ‘भारतातील मुसलमान त्यांच्या पाकिस्तानी मुसलमान भावंडांपासून वेगळे आहेत असे हिंदूंनी समजू नये. जर भारताने पाकवर आक्रमण केले तर भारतातील पंचवीस कोटी मुसलमान पाक सैन्यात सामील होऊन भारताविरुद्ध लढतील.’
पाकिस्तान हा गेली शेकडो वर्षे भारतावर झालेल्या आक्रमणाचा परिपाक आहे. एका अर्थाने पाकिस्तान हे नैसर्गिक राष्ट्र नसून भारतावर लादलेले कायमचे राहील अशा कल्पनेने निर्माण केलेले युद्धराज्य आहे. आणि युद्ध सीमारेषा मानत नाही, म्हणूनच स्थापनेपासूनच पाकिस्तानला सीमारेषा मान्य नाहीत. तेथे कोणतेही सरकार स्थिरपणे टिकत नाही, तरीही त्यांना त्याचे काहीही वाटत नाही. कारण युद्धाला लाजलज्जा म्हणजे काय हे माहीत नसते हे सत्य आहे.
भारतात मुसलमान सुखी व सुरक्षित राहू शकणार नाहीत हे कारण देऊन देशाच्या फाळणीची मागणी केली गेली व याच कारणावरून इंग्लंडच्या संसदेने फाळणीचा निर्णय घेतला. पाकिस्तानमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा सुखी व सुरक्षित आहेत का? या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थीच येईल. कारण एकच, युद्धा ना कोणाला सुख देऊ शकत ना सुरक्षितता. सोव्हिएत संघराज्यावर वचक ठेवण्याचे निमित्तवजा नाटक करून अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदत व लष्करी साहाय्य पुरवत होती. युद्धाच्या डावपेचात १९७१ साली भारताने पाकिस्तानचा न भूतो असा पराभव केला व १९६५ व १९७१ मध्ये अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांचा चुराडा करून तांत्रिकदृष्ट्या अमेरिकेचाही पराभव केला. याचा अर्थ न कळण्याएवढे अमेरिकन राज्यकर्ते दूधखुळे नाहीत. ओबामा – मोदी भेटीमुळे दाऊद इब्राहिमपर्यंत भारताचे हात पोचणे सोपे होऊ शकते. तसे झाल्यास पाकिस्तान एकाकी पडेल.
सोव्हिएत संघराज्याला मित्राची आवश्यकता होती ती त्याकाळी भारताने पूर्ण केली. अमेरिकेला आशियामध्ये हरकाम्या हवा होता. त्याची पूर्तता पाकिस्तानने केली. आता सोव्हिएत संघराज्य विसर्जित झाले आहे. अमेरिकेला चीनशी टक्कर देण्याकरिता पाकिस्तानचा उपयोग करता येणार नाही हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे अमेरिका आता भारताशी पूर्वीसारखे वैर मांडेल असे वाटत नाही.
पाकिस्तानच्या युद्ध करण्याच्या खुमखुमीवर कोणतेही औषध सध्या दिसत नाही. बरीच वर्षे युद्ध केले नाही तर देश नाहीसा होण्याची शक्यता आहे आणि एक सर्वंकष युद्ध झाले तर पुनः युद्ध करण्यासाठी देश अस्तित्वात राहणार नाही अशा ‘हॅम्लेट’ अवस्थेमध्ये पाकिस्तान अडकले आहे. चिंतेची बाब हीच आहे की युद्धखोर दुर्योधन, दुःशासन मरून जातात, पण पुत्रहीन बनलेल्या मातांचे व पतिहीन बनलेल्या विधवांचे सांत्वन विजयी झालेल्या युधिष्ठिरालाच करावे लागते.