पाकिस्तानी संघ पुरस्कर्त्याच्या शोधात

0
129

इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या पाकिस्तान संघ सध्या पुरस्कर्त्याच्या शोधात आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाला तेथे स्पॉन्सर्स मिळेनासे झाले आहेत आणि आतापर्यंत केवळ एकाच कंपनीनं स्पॉन्सरशीपसाठी बोली लावली आहे. ती सुद्धा जून्या स्पॉन्सर्सच्या रकमेतील ३० टक्केच आहे.

कोरोना विषाणुंमुळे कोणी स्पॉन्सर्स पुढे येत नसल्याचे पीसीबीच्या विपणन विभागाने सांगितले. याशिवाय पीसीबीला स्थानिक क्रिकेट स्पर्धांसाठीही पुरस्कर्ते शोधण्यात अडचण येत आहे. आधीच्या स्पॉन्सर्ससोबतचा (पेप्सी) करार केव्हाच संपुष्टात आला आहे आणि त्यामुळे इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंच्या ट्रेनिंग किटवर एकच लोगो दिसत आहे.

पेप्सी व पाकिस्तान क्रिकेट संघाचे नाते मागील दशकभरापेक्षा जास्त कालावधीचे आहे. परंतु, यावेळी पेप्सीने पाकिस्तानशी काडीमोड घेतला आहे. भारतातील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ‘पेप्सीको’ कंपनीने पाकिस्तान क्रिकेट संघाशी असलेली स्पॉन्सरशिप रद्द करावी, अशी मागणी सोशल मीडियावर केली जात होती.

पेप्सीकोच्या उत्पादनांवर भारतात बहिष्कार घालण्याचे आवाहनही करण्यात आले होते. पेप्सीको इंडियाने मात्र त्यावेळी मौन बाळगणे पसंत केले होते. पुरस्कर्त्यांद्वारे मिळणार्‍या रकमेतून पाकिस्तानी क्रिकेट संघातील कसोटी सदस्याला ४,५०,००० तर टी-ट्वेंटी व वनडेसाठी २,२५,००० रुपये मिळत होते.