>> बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे कृत्य; 30 पाकिस्तानी जवानांना केले ठार; कारवाई केल्यास ओलिसांना ठार मारण्याची धमकी
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ह्या फुटीरतावादी संघटनेने काल चक्क पाकिस्तानमधील एका रेल्वेचे अपहरण केले. बीएलएने दहशतवादी हल्ला करत 450 प्रवाशांसह जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले. अपहरणावेळी प्रतिकार करणाऱ्या रेल्वेतील 30 पाकिस्तानी जवानांना बीएलएच्या सैनिकांनी ठार मारले. बीएलएने एक निवेदन जारी करत रेल्वेसह 214 प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा केला आहे. तसेच रेल्वेतील महिला, मुले, बलुचचे नागरिक आणि परदेशी नागरिकांना सोडण्यात आल्याचे म्हटले आहे. पाकने कुठलीही कारवाई केली, तर ओलीस असलेल्या सर्व प्रवाशांना मारुन टाकण्याची धमकीही बीएलएने दिली आहे. ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात बीएलएने काही मागण्या केल्या आहे. त्यात पाकिस्तानपासून स्वातंत्र्य द्या, ही प्रमुख मागणी केली आहे. तसेच बलुचिस्तानमध्ये ज्या सोन्याच्या खाणी व अन्य साधनसंपत्ती आहे, त्याचा उपयोग आमच्या प्रांताचा विकास करण्यासाठी केला जावा, अशीही मागणी बलुचिस्तानने केली आहे.
अपहरणकांडाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जाफर एक्स्प्रेस नावाची ही रेल्वे बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तुनख्वा येथील पेशावर येथे जात होती. रेल्वेच्या नऊ डब्यांमध्ये सुमारे 450 प्रवाशी होते. पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) च्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना घेऊन जाणारी ही रेल्वे बोलान भागातील एका बोगद्यातून जात असताना दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आणि रेल्वे थांबवली. यानंतर बीएलएच्या शस्त्रधारी सैनिकांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात लोकोपायलट जखमी झाला.
याशिवाय पाकच्या सुरक्षा दलातील 30 जवानही या हल्ल्यात ठार झाले. रेल्वे थांबल्यानंतर सर्व शस्त्रधारी सैनिक आत चढले आणि त्यांनी रेल्वेचा ताबा घेतला. बलुच लिबरेशन आर्मीकडून पंजाबी आणि पाकिस्तानी सैन्याशी निगडीत लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे. बीएलएच्या सैनिकांनी सिब्बीजवळील बोगदे 8 त्यांच्या नियंत्रणात घेतले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने याबाबत अधिकृतपणे निवेदन देत रेल्वे आमच्या ताब्यात असल्याचे जाहीर केले आहे.
ज्या ठिकाणी ही रेल्वे रोखण्यात आली तो डोंगराळ आणि अतिशय दुर्गम भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहचणे आणि बचाव मोहीम राबवणे पाकिस्तानी सैन्यासाठी मोठे आव्हान आहे. या घटनेमुळे पाकिस्तानचे शहबाज सरकार आणि सैन्य
हादरले आहे.
बीएलएच्या स्थापनेमागे उद्देश काय?
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना 2000 मध्ये करण्यात आली होती. स्थापनेपासूनच बीएलएने पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले केले आहेत. बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळा स्वायत्त प्रदेश किंवा देश बनवण्यासाठी बीएलएची स्थापना करण्यात आली होती. स्वायत्त बलुचिस्तानबाबत पाकिस्तानमध्ये जवळपास सात दशकांपासून संघर्ष सुरू आहे. या काळात या प्रदेशात अनेक बलुच संघटना उदयास आल्या. यापैकी बीएलए ही सर्वात मजबूत आणि अधिक काळ अस्तित्वात असलेली संस्था आहे. बीएलएमध्ये 6000 बलुच बंडखोर सहभागी आहेत.
पाकिस्तानी सैनिक, पोलिसांना बनवले बंधक
बीएलएकडून जारी निवेदनात दावा केला आहे की, आमच्याकडे बहुतांश बंधक पाकिस्तानी सैन्य आणि सरकारचे कर्मचारी आहेत. पंजाबच्या लोकांनाही बंधक बनवण्यात आले आहे. बंधकांमध्ये पाकिस्तानी सैनिक, पोलीस, दहशतवादविराधी पथक, इंटर सर्विसेज इंटेलिजेंसचे अनेक कर्मचारी आहेत. हे सर्व सुट्टीवर पंजाबला चालले होते, असा दावा बीएलएने केला आहे. त्याशिवाय बंधकांमधून महिला, मुले आणि बलूचच्या प्रवाशांची सुटका केली आहे. परदेशी नागरिकांनाही सोडण्यात आल्याचे बीएलएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ पाकिस्तानी सैन्य आणि सरकारचे कर्मचारी आणि पंजाबी लोकांना बंधक बनवण्यात आले आहे.