पाकिस्तानात सरकारविरोधी आंदोलन तीव्र

0
74
आंदोलकांना रोखण्याची तयारी करताना पोलीस.

लष्कराकडून हस्तक्षेपाची शक्यता
पाकिस्तानात सध्या सुरु असलेले सत्ता विरोधी आंदोलन तीव्र बनले असून, स्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकार विरोधी निदर्शक आणी पोलीस यांच्यातील संघर्षात आतापर्यंत तिघे मृत्यू पावल्याचे तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, स्थिती कठीण होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर काल लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी कमांडर्सची बैठक बोलावून अंतर्गत सुरक्षेविषयी चर्चा केली.
राष्ट्रपती निवास, नॅशनल असेंब्ली, सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान कार्यालय असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांनी परवा मध्यरात्री बॅरीकेड्‌स तोडून पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या निवासस्थानाकडे चाल केल्यानंतर पोलीस व आंदोलक भिडले.
दरम्यान, पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरावर मोर्चा नेण्याविषयी इम्रान खान यांच्या पक्षात मतभेद निर्माण झाल्यानंतर काल तेहरीक ए इन्साफ पक्षाच्या चार नेत्यांना बडतर्फ करण्यात आले.
गेल्या वर्षी धोकेबाजी करून सरकार निवडणूक जिंकल्यावरून पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन गेले १८ दिवस चालू आहे. आंदोलकांचे नेतृत्व पाकिस्तानचे विरोधी नेते माजी क्रिकेटपटू इम्रान खान व धर्मगुरू ताहीर उल कादरी हे करत आहेत.
दरम्यान, आंदोलनामुळे बिघडत चाललेल्या सुरक्षेच्या प्रश्‍नावर काल लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनी तातडीने बैठक घेतली. ही बैठक सोमवारसाठी ठरली होती. मात्र अचानक ती रविवारीच घेण्यात आली. परिस्थिती उद्भवली तर लष्करी हस्तक्षेप करण्याविषयीही बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.
दरम्यान, आंदोलकांशी बोलणी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे काल सरकारने सांगितले. सरकारला शांती हवी आहे, वाटाघाटींना तयार आहोत, असे पाकिस्तानचे मंत्री परवेझ रशीद म्हणाले. परवा मध्यरात्री पाकिस्तानी संसद परिसरात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांनी उग्र रूप धारण करून संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. शिवाय तेथे उभ्या वाहनांना आगी लावल्या व दगडफेक केली. सुरक्षा फौजांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व रबरी गोळ्या झाडल्या. यात सुमारे ५०० आंदोलक तर ९० पोलीस जखमी झाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या सर्व प्रकरणास ङ्गपेल्यातील वादळ असे संबोधून ते लवकरच निवळेल असे सांगितले. लोकशाहीला सुरूंग लावण्याचा काही शक्ती प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.
आंदोलकांचे नेते कादरी यांनी म्हटले की, शरीफ यांनी आपला धंदा चालवण्यासाठी सत्तेचा वापर सुरू केला आहे. नागरिक, सरकारी कर्मचारी, पोलीस यांनी सरकारविरुद्ध बंड पुकारावे असे आवाहनही त्यांनी केले. इम्रान खान यांनीही, शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचे सांगितले. सध्याचे नवाज शरीफ सरकार १५ महिन्यांपूर्वी सत्तेत आले होते.