पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटात 44 जणांचा मृत्यू

0
9

पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमध्ये काल रविवारी 30 जुलै रोजी जमियत उलेमा इस्लाम-फझलच्या अधिवेशनात झालेल्या या दुर्दैवी घटनेत संबंधित राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यासह किमान 44 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 200 हून अधिक जण जखमी झाले. हल्ल्याची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. यावेळी रॅलीत अनेकांची उपस्थिती होती. समर्थकांमध्येच हल्लेखोर उपस्थित होते, असे मानले जात आहे. त्यामुळे हा आत्मघाती हल्ला मानला जात आहे.

जमियत उलेमा इस्लाम-फझल नेते हाफिज हमदुल्ला हे या रॅलीला संबोधित करणार होते. मात्र, काही कारणास्तव ते येथे पोहोचू शकले नाहीत. नंतर मीडियाशी संवाद साधताना हाफिज यांनी, या स्फोटात आमचे सुमारे 35 कार्यकर्ते ठार झाले आहेत. मी या घटनेचा निषेध करतो. अशा हल्ल्यांनी आमचे मनोबल खचणार नाही असे सांगितले.
बाजौर जिल्हा आपत्कालीन अधिकारी साद खान यांनी खारमधील जेयूआय-एफचे प्रमुख नेते मौलाना झियाउल्लाह जान यांचा स्फोटात मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जखमींना पेशावर आणि टाइमरगेरा येथील रुग्णालयात हलवले जात आहे. जखमींमध्ये स्थानिक पत्रकारांचा समावेश आहे. पोलिसांनी परिसराला वेढा दिला आहे.

या घटनेनंतर सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी हा हल्ला म्हणजे देशाला कमकुवत करण्याचे आणखी एक षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.