>> दक्षिण आफ्रिकेच्या सर्वबाद २२० धावा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानची पहिल्या डावात १८ षटकांत ४ बाद ३३ अशी केविलवाणी स्थिती झाली आहे. पाहुण्या द. आफ्रिकेचा डाव ६९.२ षटकांत अवघ्या २२० धावांत संपवल्यानंतर पाकिस्तानचा संघ वर्चस्व गाजवणे अपेक्षित होते. परंतु, रबाडा, महाराज व नॉर्के यांनी त्यांचे कंबरडे मोडले आहे.
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने या सामन्यासाठी डावखुरा फिरकीपटू नौमन अली तसेच सलामीवीर इम्रान बट्ट यांना कसोटी पदार्पणाची संधी दिली. दुसरीकडे द. आफ्रिकेने केशव महाराज व जॉर्ज लिंडा या दोन डावखुर्या फिरकीपटूंसह उतरण्याचा निर्णय घेतला. द. आफ्रिकेकडून सलामीवीर डीन एल्गार याने आपले सोळावे कसोटी अर्धशतक झळकावताना सर्वाधिक ५८ धावा केल्या. १०६ चेंडूंचा सामना करताना त्याने ९ चौकार लगावले. अष्टपैलू जॉर्ज लिंडा याने ३५ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून लेगस्पिनर यासिर शाह सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५४ धावांत ३ गडी बाद केले. नौमन अली, शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी २ तर हसन अलीने १ गडी बाद केला. पाहुण्यांचे दोन फलंदाज धावबाद झाले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानच्या डावाची सुरुवात खराब झाली. रबाडाने सलामीवीर आबिद अली (४) याचा त्रिफळा उडवून संघाला झकास सुरुवात करून दिली.
पदार्पणवीर बट्टदेखील फार काळ टिकला नाही. रबाडाने त्याला ‘गली’मध्ये झेल देण्यास भाग पाडले. कर्णधार बाबर आझमचा मौल्यवान बळी केशव महाराज याने मिळविला. त्याने बाबरला केवळ ७ धावांवर पायचीत केले. शाहीन आफ्रिदीला नाईटवॉचमनच्या रुपात पाठवण्याचा निर्णयदेखील पाकिस्तानच्या अंगलट आला. नॉर्केने त्याचा शून्यावर त्रिफळा उडवला. दिवसअखेर अझर अली (५) व फवाद आलम (५) नाबाद होते. पाकिस्तानचा संघ अजून १८७ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे केवळ ६ गडी शिल्लक आहेत.