पाकिस्तानकडून सीमेवर  गोळीबार चालूच; ५ मृत्युमुखी

0
102
ईद उत्सवादिवशी काल श्रीनगरमध्ये पोलीस व नागरिक यांच्यात चकमकी उडाल्या.

भारताकडून पुन्हा ताकीद
आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने गोळीर चालूच आहे. सोमवारी पुन्हा जम्मू जिल्ह्यात पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या तुफान गोळीबारात पाच नागरीक मृत्युमुखी पडले तर २९ अन्य जखमी झाले. दरम्यान, पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन करण्याची घटना घडली.पोलीस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या बाजूने झालेल्या मशीन गन्सच्या गोळीबारात व रॉकेट हल्ल्यात एकूण पाच नागरिक मृत्युमुखी पडले. यात १५ वर्षीय मुलगी व ५० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. पाकिस्तानी रेंजर्स मुलकी भागांना लक्ष्य करीत असल्याने एकुण २९ जण जखमी झाले आहेत. काल एक ग्रेनेड पाकिस्तानच्या बाजूने येऊन आंतरराष्ट्रीय सीमेपासून ४ कि.मी. अंतरावरील अर्निया बसस्थानकावर पडले.
या घटनेनंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरही बेधूंद गोळीबार भारतीय चौक्यांच्या दिशेने सुरू केला. काल सकाळी ८.३० वा. सुरू झालेला हा गोळीबार उशीरा दुपारपर्यंत चालू होता.
दरम्यान, पाकिस्तानच्या बाजूने सातत्याने मुलकी भागांना लक्ष्य केले जात असून लोकांना कमीत कमी हानी व्हावी यासाठी लष्कर कार्यरत असल्याचे जम्मू विभाग आयुक्तांनी सांगितले.
भारताच्यावतीने नियंत्रण रेषेवर लष्कर तर आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमासुरक्षा दल पहारा देते.
वाघा सीमेवर मिठाईची देवघेव रद्द
अमृतसर : सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर इदनिमित्त भारत-पाकिस्तान लष्करादरम्यान होणारा वाघा सीमेवरील मिठाई देवघेव कार्यक्रम काल रद्द करण्यात आला. भारताचे सीमा सुरक्षा दल व पाकिस्तानी रेंजर्सच्या अधिकार्‍यांत परवा संध्याकाळी झालेल्या ध्वज बैठकीत रेंजर्सनी मिठाई देवघेव कार्यक्रमासाठी वेळ ठरविण्याबाबत चालढकल केल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. काल सीमेवरील गेट्‌स बंद राहिल्या.
भारताकडून पुन्हा ताकीद
नवी दिल्ली : पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार तात्काळ थांबवावा तसेच नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करू नये, अशी ताकीद भारताने काल पुन्हा पाकिस्तानला दिली. देशातील परिस्थिती आता बदलली आहे, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे, असे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले. गृहमंत्र्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय सीमा तसेच नियंत्रण रेषेवरील स्थितीचा अहवाल मागविण्यात आला आहे.
‘एलओसी’वर शुभेच्छा
सीमेवर तणाव असतानाही भारत व पाकिस्तान लष्कराने नियंत्रण रेषेवर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच एकमेकांना मिठाईचेही वाटप केले. पूंछ जिल्ह्यातील चंकन दा बाग या नियंत्रण रेषेवरील गेटवर हा कार्यक्रम झाला.