जम्मू – काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याची भारताची कृती एकतर्फी व बेकायदेशीर असल्याचा दावा करून पाकिस्तानने भारताचे पाकमधील उच्चायुक्त अजय बिसारिया यांची परत पाठवणी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच भारत – पाक दरम्यानचे राजनैतिक संबंध घटविण्याचा निर्णयही घेतला आहे.
जम्मू – काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारत सरकारने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा समिती (एनएससी), वरीष्ठ राजकीय नेते व लष्करी अधिकारी यांची एक तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर वरील निर्णय जाहीर करण्यात आल. यावेळी भारतबरोबरील व्यापारी संबंध तोडण्याचा व द्विपक्षीय संबंधांचा फेरआढावा घेण्याचे ठरविण्यात आले, अशी माहिती इम्रान खान यांनी दिली.
या बैठकीनंतर पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी टीव्हीच्या माध्यमातून घोषणा केली की, यापुढे पाकिस्तानचा राजदूत नवी दिल्ली नसेल आणि त्यांच्या (भारताच्या) राजदुतांनाही माघारी पाठविले जाईल. तूर्तास भारताचे पाकमधील उच्चायुक्त बिसारिया इस्लामाबादमध्ये आहेत. पाकचे भारतातील राजदूत मोईनुल हक यांनी अजून दिल्लीतील आपल्या पदाचा ताबा घेतलेला नाही.
पाकच्या एनएससीच्या बैठकीनंतर एक निवेदन जारी करण्यात आले असून त्यात जम्मू-काश्मीरवरील भारताच्या ऐतिहासिक निर्णयावर चर्चा झाली, असे म्हटले आहे. काश्मीर विषय संयुक्त राष्ट्रांकडे नेण्याचाही निर्णय झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन हा काश्मीरी जनतेशी एकसंघ राहण्याचा दिवस मानला जाईल व १५ ऑगस्ट काळा दिवस पाळला जाईल, असे निवेदनात जाहीर केले आहे.