>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर हवाई तळावर जवानांशी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट देत जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या शौर्याचे भरभरून कौतुक केले आहे. आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारले. भारताने केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाही जोरदार प्रत्युत्तर देऊन आपली ताकद दाखवून दिली आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने आपली लष्करी कारवाई पुढे ढकलली. जर पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी कारवाया किंवा लष्करी धाडस केले तर आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ, असा इशारा यावेळी पंतप्रधान मोदींनी दिला.
पंतप्रधान मोदींच्या या भेटीत हवाई तळावरील लढाऊ विमान मिग-29 आणि भारताचे सुरक्षा कवच ठरलेली एअर डिफेन्स सिस्टीम एस-400 देखील जगाला दिसली. आदमपूर हवाई तळासह तिथे तैनात असलेली एस 400 देखील नष्ट केल्याचा पाकिस्तानी हवाई दलाने दावा केला होता, तो दावा काल भारताने खोडून काढला.
ज्या पाकिस्तानी सैन्यावर हे दहशतवादी अवलंबून होते त्यांना भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीयांनी पराभूत केले. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला हे देखील दाखवून दिले की पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे दहशतवादी आरामात श्वास घेऊ शकतील. आम्ही घरात घुसून मारू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.
आपल्या ड्रोन, क्षेपणास्त्रांनी पाकची उडवली झोप
भारताच्या आधुनिक लष्करी क्षमतेचे कौतुक करून मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. आपले ड्रोन, आपली क्षेपणास्त्र त्यांच्याबद्दल फक्त विचार केल्याने पाकिस्तानची अनेक दिवसांची झोप उडून जाईल. वाईटाचा नाश करण्यासाठी आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा आहे. म्हणूनच जेव्हा आमच्या बहिणी आणि मुलींचे सिंदूर हिसकावून घेतले गेले, तेव्हा आम्ही दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना चोख उत्तर दिले, असेही मोदी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. दहशतवादाच्या सूत्रधारांना आता कळून चुकले आहे की भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास एकच परिणाम होईल तो म्हणजे विनाश, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.