पाकची कबुली

0
32

कारगिलमध्ये जे घडले, त्यामागे पाकिस्तानचे लष्करच होते, अशी कबुली त्या पापाचा घडा भरून गेल्यावर, भरून काय उतून, वाहून गेल्यावर पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी त्या देशाच्या संरक्षणदिन कार्यक्रमात बोलताना नुकतीच अनवधानाने का होईना, दिली आहे. भारताशी झालेल्या 1948, 1965, 1971 मधील युद्धांचा आणि सियाचीन युद्धाचा संदर्भ देताना कारगिलचाही स्पष्ट उल्लेख त्यांनी केला. कारगिलमधील भारताविरुद्धची मोहीम हे काश्मिरी दहशतवाद्यांचेच कृत्य होते आणि त्यात पाकिस्तानी लष्कराचा कोणताही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग नव्हता असेच तुणतुणे पाकिस्तान आजवर वाजवत आला. स्वतः त्या मोहिमेचे सूत्रधार परवेझ मुशर्रफ यांनीही अनेक वर्षे तेच तुणतुणे लावले होते. पण नंतर त्यांनीही ही कबुली दिली होतीच. इतकेच कशाला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देखील कारगिलमधील पाकिस्तानी सेनेच्या सहभागाची कबुली देऊन टाकली होती. आपल्याला त्या मोहिमेची कल्पना आपल्या कार्यकाळात लष्कर प्रमुखपदी असलेल्या परवेझ मुशर्रफ यांनी दिलीच नव्हती, असा दावा करण्याची बदमाशी शरीफ यांनी केली होती. मुशर्रफ यांनी मात्र शरीफ यांना त्याची कल्पना होती अशीच भूमिका नंतर घेतली होती. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कराचा प्रमुखच कारगिलचे नाव घेतो याहून दुसरा दुजोरा काय हवा? कारगिलमधील उंच शिखरे ताब्यात घेऊन लडाखमधून जाणारी काश्मीरची रसद तोडायचा तो कुटील डाव होता आणि त्याद्वारे काश्मीर बळकावायचा पाकिस्तानचा प्रयत्न होता हे तर स्पष्ट झालेच आहे. सुदैवाने भारतीय सैन्याने अथक प्रयत्नांती आणि आपले कित्येक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि जवानांच्या प्राणांची आहूती देऊन द्रास आणि कारगिलमधील ती उंच शिखरे पुन्हा आपल्या ताब्यात घेतली आणि काश्मीर हातचे जाऊ दिले नाही. आपले किमान 26 बडे लष्करी अधिकारी आपण त्या युद्धात गमावले. मृत्युमुखी पावलेल्या जवानांची संख्या तर 523 वर जाऊन पोहोचली. कित्येक धडाडीचे तरुण, उमदे लढवय्ये त्या मोहिमेत हकनाक बळी गेले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानशी मैत्रीचा हात अतिशय निर्मळ मनाने पुढे केला असता त्या प्रामाणिक इराद्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कृत्य मुशर्रफ यांच्या पुढाकाराने आखल्या गेलेल्या त्या मोहिमेने केले. पुढे मुशर्रफ यांनी शरीफ यांची सत्ताच लष्करी बळावर बळकावली. त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पंतप्रधानपदी पोहोचलेला क्रिकेटपटू इम्रान खान बदनाम होऊन सध्या तुरुंगात आहे. शरीफ बंधूंच्या हाती पुन्हा सत्तेची दोरी आली आहे. अशा वेळी पाकिस्तानी लष्करप्रमुखाने कारगिलच्या युद्धातील पाकिस्तानच्या सहभागाची ही कबुली दिलेली आहे. पाकिस्तानातील राजकीय आणि लष्करी समीकरणे पूर्णपणे पालटलेली आहेत हेही ह्या कबुलीचे एक प्रमुख कारण आहे. तत्कालीन लष्करी राजवटीकडून झालेल्या त्या नापाक कृत्याचा उल्लेख करताना विद्यमान लष्करप्रमुखांकडून निषेधाचा सूर कुठेही उमटलेला नाही हेही येथे लक्षात घेणे जरूरी आहे. काश्मीरवरचा दावा पाकिस्तानने आजही सोडलेला नाही. त्यामुळे ह्या कबुलीला तसा काही अर्थही नाही. पाकिस्तान हा विषारी साप आहे. कितीही दूध पाजलेत तरी तो फुत्कार सोडतच राहणार आहे. आपल्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला, आपण गप्प बसलो. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, आपण गप्प बसलो. काश्मीरमध्ये आणि इतरत्र असंख्य हल्ले आणि बॉम्बस्फोट झाले. आपण गप्पच बसलो. परंतु नंतर नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मात्र ही बचावात्मक नीती बदलली. आधी सीमेपलीकडचा सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामानंतर बालाकोटच्या कारवाईने पाकिस्तानला धाक बसवला होता, परंतु अलीकडे पुन्हा त्याने काश्मीरमध्ये डोके वर काढले आहे. जम्मू विभागात पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी थैमान घालत आहेत. एकीकडे ही सगळी दहशतवादी नापाक कृत्ये पुन्हा सुरू झाली असताना दुसरीकडे मैत्रीची भाषाही पाकिस्तान करताना दिसतो आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या एससीओ परिषदेसाठीचे निमंत्रण काय त्याने धाडले आहे, मैत्रीची भाषा काय चालली आहे, परंतु दुसरीकडे बांगलादेशातील यादवीमध्ये भारतविरोधी थयथयाट करणाऱ्या कर्मठ शक्तींना सर्वतोपरी पाठबळ पुरवण्याचे काम पाकिस्तानच करतो आहे. त्यामुळे पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील दहशतवाद थांबवला तर त्या देशाशी चर्चेची तयारी असल्याचे आपले संरक्षणमंत्री जरी म्हणत असले, तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांचे ते विधान केवळ काश्मीरमधील निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केलेले आहे एवढेच.