पाकचा हात

0
30

बैसरानमधील दहशतवादी हल्ल्याला बारा दिवस झाले. ज्या प्रखर शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यांच्या पाठीराख्यांविरुद्ध लढण्याचा निर्धार प्रकट केला आहे, तो पाहता यावेळी ह्या दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधारांचे वाचणे कठीण दिसते. बैसरान हल्ल्याशी आपला काही संबंध नाही असे जरी पाकिस्तान सांगत आला असला, तरी ह्या हल्ल्याशी त्याचे थेट धागेदोरे जुळल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या आतापर्यंतच्या तपासातून पुरते स्पष्ट झालेले आहे. जे दहशतवादी बैसरान हल्ल्यात सामील होते, त्यामध्ये हाश्मी मुसा ऊर्फ सुलेमान आणि अलीभाई ऊर्फ ताल्हाभाई हे दोघे दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असून लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी असल्याचे एनआयएने शोधून काढले आहे. ह्या हल्ल्याचा कट लष्कर ए तय्यबाच्या मुख्यालयातच शिजला, शिवाय बैसरान हल्ल्यावेळी दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या हँडलर्सच्या संपर्कात होते, त्यासाठी चिनी बनावटीचे उपग्रहाधारित फोन वापरले गेले ह्या सगळ्याची माहिती एनआयएने आतापर्यंत गोळा केली आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये आश्रय देण्यापासून त्यांना हल्ल्यासाठी आणि नंतर स्थानिक परिसराची सगळी माहिती पुरवण्यापर्यंत ज्या स्थानिक हस्तकांनी सहाय्य केले, त्यांची यादी देखील एनआयने बनवली आहे. गेल्या काही दिवसांत बैसरान घटनेशी ज्यांचा ज्यांचा संबंध आढळला, त्यांची घरे बॉम्बद्वारे उडवून देऊन भारतीय लष्कराने एक कठोर संदेश दिला आहे. काश्मीर खोऱ्यात आजवर जवळजवळ तीन हजार लोकांच्या जबान्या एनआयएने नोंदवल्या आहेत आणि दीडशे संशयितांना जेरबंद केले आहे. मात्र, दहशतवादी हल्ला होऊन बारा दिवस उलटले, तरी सुरक्षा यंत्रणांनी सर्व जंग जंग पछाडूनही ह्या हल्ल्यातील दहशतवादी सापडू शकलेले नाहीत ही काही भूषणावह बाब नाही. हे दहशतवादी अद्याप दक्षिण काश्मीरमध्येच दडून बसले असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे असले, तरी एवढे दिवस जंगलामध्ये अन्नपाण्याच्या तरतुदीविना हे सगळे तग धरू शकले नसते. स्थानिक पाठबळानिशीच त्यांना हे शक्य झाले आहे हे उघड आहे. ह्या एकेका दहशतवाद्याचा हिशेब झालाच पाहिजे. गेल्या वर्षी सोनमर्गच्या बोगद्यामध्ये दहशतवादी हल्ला होऊन सात कामगारांना आणि एका डॉक्टरची हत्या करणारेही हेच दहशतवादी होते असे एनआयएचे म्हणणे आहे. त्या हल्ल्यानंतर जुनैद अहमद भट हा दहशतवादी चकमकीत ठार झाला, परंतु बाकीचे पुन्हा दहशतवादी हल्ला चढवण्याइतपत सज्ज होते ही विशेष लक्षात घेण्याजोगी बाब आहे. पाकिस्तानच्या आयएसआयच्या सक्रिय सहकार्याविना हे त्यांना शक्यच झाले नसते. बैसरानच्या सुंदर कुरणामध्ये तब्बल चाळीस रिकामी काडतुसे एनआयएला आढळून आली आहेत, म्हणजेच एवढ्या गोळ्यांचा वर्षाव पर्यटकांवर झाला. पर्यटक वेचून वेचून, त्यांचा धर्म विचारून, त्यांना कुराणमधील कलमा म्हणायला लावून, पँटी उतरवून त्यांना बायकामुलांसमक्ष ठार मारले गेले आहे. इस्रायलमध्ये हमासने ज्या रानटीपणे दहशतवादी हल्ला चढवला होता, त्याच स्वरूपाचा हा बैसरानचा दहशतवादी हल्ला होता ह्यात कोणताही संशय नाही. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे ज्या पाकिस्तानकडे बोटे दाखवत आहेत, त्याला कोणती कठोर सजा भारत यावेळी देणार ह्याकडे अवघ्या देशाचे लक्ष आहे. आतापर्यंत जे निर्णय सरकारने घेतले ते सौम्य स्वरूपाचे आहेत. ती केवळ सुरूवात आहे. ठोश्यास ठोसा न्यायाने उत्तर दिल्याखेरीज आता पर्याय नाही, परंतु त्यामध्ये धोकाही तितकाच मोठा आहे. त्यामुळे ह्या पेचातून भारत सरकार कोणता पर्याय अवलंबिते हे पाहण्याजोगे आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या अनुदानावर त्याचा सगळा डोलारा बेतलेला आहे. एफएटीएफच्या काळ्या यादीत जाण्यापासून वाचवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानने दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईचा मोठा देखावा उभा केला होता. आता एफएटीएफपुढे बैसरान हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग पुन्हा सिद्ध करून त्याच्यावर आर्थिक निर्बंध घालण्यास भाग पाडण्याचे काम भारताला करावे लागेल. गेल्या वर्षी जुलैमध्ये पाकिस्तानला तीन वर्षांसाठी सात अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली आहे. तो निधी रोखण्यासाठी भारताने दबाव आणला पाहिजे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांनी पाकिस्तान यापूर्वी अमेरिका आणि ब्रिटनच्या सांगण्यावरून भारतविरोधी कारवाया करीत असे ह्याची कबुली नुकतीच दिलेली आहे. माजी विदेशमंत्री बिलावल भुत्तोंनीही ते काही गुपीत नसल्याचे म्हटले आहे. भारतविरोधी दहशतवादी कृत्यांतील पाकिस्तानच्या सहभागाचे ह्याहून मोठे पुरावे कोणते हवेत?