– डॉ. सचिन कांदोळकर
पूर्वी ‘नेमेचि येतो मग पावसाळा, सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ अशी सुरुवात केल्यावाचून पावसावरचा लेख कुणी लिहीत नसत. आता बदलाचे वारे सगळीकडे वाहते आहे. माणूस बदलला आहे. निसर्गातही बदल घडून आला आहे. त्याकाळी ‘आवडता ऋतू’ या विषयावर शालेय मुलांना निबंध लिहावा लागे. निबंधाची सुरुवातच मुळी अशी असे– ‘वर्षाचे ऋतू तीन– हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा.’ मग आपल्या आईचे उदाहरण ः ‘आईला आपली सगळी मुले प्रिय असतात. पण त्यातल्या त्यात एका मुलावर तिचे अधिक प्रेम असते. तसेच मला की नाही सर्व ऋतू आवडतात. पण त्यातल्या त्यात पावसाळा अधिक आवडतो.’ पुढे मग पावसाळ्याचे वर्णन. आज घरे पूर्वीसारखी राहिलेली नाहीत. घराघरांमध्ये जास्त मुले कुठे आहेत? त्यामुळे आईचे उदाहरण आता कुणी देत नाही.
सृष्टी बदलली की दृष्टी?
माणसाप्रमाणे पाऊसही बदलला आहे. ‘नेमाने’ येणार्या पावसाचे तेव्हा किती कौतुक व्हायचे? आता पावसाचे काही खरे नाही बुवा! तो यायच्या वेळी नेमका कुठे दडी मारून बसेल हे सांगता यायचे नाही. पैशाचे आमिष दाखवूनही तो जरासुद्धा झडणार नाही. आज पैसा केवढा मोठा झाला आहे? पण त्याला याची किंमत नाही. माणूस म्हणतो पाऊस खोटा झाला आहे. ज्याचे मडके भरले आहे, तो आणखी काय म्हणणार? तो असाच कुठल्या कुठे वाहतच जाणार!
पाऊस आज आहे, उद्या नाही. ठरल्या वेळेपेक्षा लवकर आला म्हणून कुणी त्याचे स्वागत करणार नाही. अन् वेळेवर येणार्यांना कोण विचारतो? हा उशिरा आला तरी एखादा अनिलांसारखा कवी त्याचे कौतुक करतो, त्याला तळहातावर झेलतो. कवी म्हणतो–
असा उशिरा आलेला पाऊस
तळहातावर झेलून घ्यावा
टिपून ल्यावा पापण्यांवरती
कपाळीच्या घामामध्ये मिळवावा
पावसाकडे लडिवाळपणे पाहायला कोण तयार आहे? उभा जन्म ‘एअरकंडिशन्ड’मध्ये घालवणार्यांना कपाळीच्या घामामध्ये तो कसा ‘मिळवता’ येईल? हां, त्याला पाहून कपाळीच्या आठ्या मात्र नक्कीच वाढतील.
पहिल्या पावसाची वाट पाहण्याचे गेले ते दिवस. पूर्वी अख्खा मे महिना याची वाट पाहण्यात निघून जायचा. शेतकर्यांची लगबग तर सुरू व्हायचीच. पण जूनमध्ये प्रचंड पाऊस पडेल, सगळीकडे पूर येईल, घरातून पाय बाहेर काढता येणार नाही म्हणून ‘पुरुमेंता’साठी किती धावपळ करावी लागे. खेड्यापाड्यात तर घरे शाकारण्याचा आणि पावसापुरत्या तात्पुरत्या खोपट्या उभारण्याचा वार्षिक कार्यक्रम थाटामाटात पार पडायचा. आता गावाकडच्या घरांवर गावठी कौले दिसणार नाहीत. गावठी नळ्यांचे कधी ‘नळकुटे’ झाले कळलेच नाही. आणि खोपट्या कशाला उभारायच्या? वरून फक्त ‘मेणकापड’ ओढायचे. व्हरांड्यातही आता चुडतांचा झड ‘बांधायला’ नको. बांधलाच तर एकदम ‘ऑक्वर्ड’ दिसेल तो! पूर्वी चतुर्थीच्या सुमारास चुडते काढून टाकली जात होती, पाहुण्यांसमोर शोभा नको म्हणून! आता शहरात पाहुण्यांसमोर ती शोभून दिसतात!!
लहान मुले तर काळा काळा कापूस कधी पिंजेल अन् ढगांशी वारा कधी झुंजेल याची आतुरतेने वाट पाहत असत.
काळ्या काळ्या ढगांत जेव्हा|
आभाळ सगळं बुडायचं|
पांढराशुभ्र बगळा होऊन|
माझं मन उडायचं॥
अशी पाडगावकरांसारखी प्रत्येक मुलाची अवस्था व्हायची. पाऊस पडून गेल्यानंतर अंगणात साचलेल्या पाण्यामध्ये कागदी होड्या सोडणे हा मुलांचा आवडता छंद. होड्यांसाठी वह्यांची पाने आधीच राखून ठेवलेली असत. होड्यांचे प्रकार तरी किती? साधी होडी, डबल होडी, नांगर होडी, शिडाची होडी… आज या होड्या कुठे गेल्या? कुणी पाहिल्या? खरे तर होड्या सोडायला अंगण कुठे आहे? शहरात सोडा, खेड्यापाड्यांतील अंगणेही कुठल्या कुठे गायब झालेली आहेत. गाड्या ‘पार्क’ करायला अंगणे पुरत नाहीत, तिथे होड्या कुठल्या? शिवाय पावसाचे कसले पाणी घेऊन बसलात तुम्ही? राजकारण्यांच्या कृपेने विकासाची गंगा खेड्यातील अंगणापर्यंत पोहोचलेली आहे. सरकारी खर्चाने अंगणातही ‘पेव्हर्स’ बसवण्यात आलेले आहेत. तुमच्या अंगणात पाणी अजिबात साचणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. काही का असेना, बालपण ‘गमत’ होते ते अंगणात आणि तेदेखील पावसातील अंगणात!
निसर्गाशी तादात्म्य
प्रत्येकाने बालपणातील पाऊस जपून ठेवलेला असतो. मंगेश पाडगावकरांनी ‘वेंगुर्ल्याचा पाऊस’ या कवितेत पावसाचे जे वर्णन केले आहे, ते कुणालाही आपल्याच बालपणातील वाटेल. पाडगावकर सांगतात–
वेंगुर्ल्याचा पाऊस कसा
माया करीत यायचा
सरींनी लाड करीत
मला कुशीत घ्यायचा.
बालपण माझं सगळं
भिजवलं त्याने
आईसारखं मला थोपटून
निजवलं त्याने.
मला जाग येईल म्हणून
हळूच निघून जायचा.
प्रत्येकाचे बालपण पावसाने असे भिजवलेले आहे, जोजवलेले आहे. आजच्या बहुसंख्य मुलांसाठी बाहेर पाऊस पडतो काय अन् पडून गेला काय, त्यांना होड्या थोड्याच सोडायच्या आहेत! ती खुशाल संगणकावर ‘गेम्स’ खेळत बसलेली दिसतील. पावसामुळे निसर्गामध्ये बदल घडून येतो तो आजच्या मुलांना कसा दिसणार? साने गुरुजींच्या साहित्यातील निसर्ग त्यांना कसा दिसणार? बालकवींची कविता त्यांना कशी कळणार? मग भोवतालच्या जगाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी कशी असेल?
आपण निसर्गाकडून साहित्याकडे वळतो की साहित्याकडून निसर्गाकडे? बालपणी म्हटलेल्या (अभ्यासलेल्या नव्हे!) कवितांमुळे आपण पावसाशी आणि पर्यायाने निसर्गाशी तादात्म्य पावू शकतो, एवढे मात्र खरे!
कोरडी पाठ्यपुस्तके
मराठीच्या जुन्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकतरी पावसाळी कविता समाविष्ट केलेली असायची. आजच्या पाठ्यपुस्तकांमधून पावसाळी कविता गायब झालेल्या आहेत. कोरडी वाटावीत अशी ही पाठ्यपुस्तके. पूर्वीची पाठ्यपुस्तके पावसावरच्या कवितांनीच नव्हे तर भावनेने ओथंबलेली असायची. (तो एक स्वतंत्रच विषय आहे.) त्यामुळे पाठ्यपुस्तकातील केवळ मोरपीस जपून ठेवले जात नव्हते, अख्खे पुस्तकच वर्षानुवर्षे घरात दिसत होते. आजच्या अकराव्या इयत्तेतील मुलांना दहाव्या इयत्तेपर्यंतच्या कविता आठवणार नाहीत. पण घरातील पंचाहत्तरीपुढील आयांना, आजीबाईंना आजही असंख्य कविता स्मरल्यावाचून राहणार नाहीत. कविता निसर्गाकडे, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देते.
बालकवी, भा. रा. तांबे, बा. भ. बोरकर, ना. धों. महानोर, ग्रेस, शांता शेळके इत्यादी कवींच्या पावसाळी कविता अभ्यासल्याशिवाय आजची मुले शालेय शिक्षण पूर्ण करतात.
पावसाच्या धारा|
येती झरझरा|
झाकळले नभ|
सोसाट्याचा वारा॥
अशा ओळी म्हणत रस्त्यातून मुले जाणार नाहीत. बालरथातून जाणार्या मुलांना ‘रस्त्याने ओहळ, जाती खळखळ’ थोडेच दिसतील? चौफेर पसरलेले ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे’, झाडांनी डोक्यास घातलेले सोनेरी मुकुुट वगैरे सोडूनच द्या! ‘श्रावणमास’ ही कविताच नाही, मग ‘क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे’ असा अनुभव तरी कसा येणार? ‘शिरवे’ या शब्दाचा अर्थ शब्दकोशात शोधायचा नसतो. तो शाळेबाहेर पडून अनुभवायचा असतो. या कवितेतील ‘झालासा सूर्यास्त वाटतो’ या ओळीतील ‘अहाहा’ हा शब्द उच्चारून पाहा. ‘अहाहा’ या शब्दातून आनंद व्यक्त होतोच, पण त्यापुढील ‘तरुशिखरांवर, उंच घरांवर’ हे शब्द उच्चारावेत. यातील अनुप्रासातून जो आनंद व्यक्त होतो, तो त्याहून अधिक आहे. तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडले आहे. हे ऊन ‘सोन्याहून पिवळे’ आहे. बालकवींच्या पावसाळी कवितांमधील ओळी गुणगुणणे म्हणजे ‘चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात’ हिंडून येणे, असेच म्हणावे लागेल. त्यांच्या कवितेतील ‘हिरवळ दाटे
चोहिकडे’मधील हिरवळ म्हणजे जीवनाचे आश्वासन आहे.
हिरवळ आणिक पाणी
बोरकर म्हणत– ‘हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी.’ काही वर्षांपूर्वी गोव्यात महाराष्ट्र शालान्त मंडळाची पाठ्यपुस्तके लावली जात होती. त्या पाठ्यपुस्तकांमधून ‘माझा गाव’, ‘सरींवर सरी’ यांसारख्या कविता प्रथम वाचनात आल्या. आता इकडच्या पाठ्यपुस्तकांमध्ये पुन्हा अशा कविता घ्यायला काय हरकत आहे? आकाशात ढग जमू लागले, खिडक्यांवर वारा वाजू लागला आणि सरींवर सरी कोसळू लागल्या की बोरकरांची पावसाळी कविता आठवली नाही असे कधी होत नाही. त्यांच्या–
घन वरसे रे|
घन वरसे रे|
वरसे जलसर|
आले सरसर|
मल्हाराचे स्वरसे रे॥
अशा कितीतरी ओळी सतत गुणगुणाव्याशा वाटतात. त्यांच्या ‘जलद भरुनी आले’, ‘खिडक्यांवर वाजे वारा’, ‘झाले हवेचे दही’ अशा कविता म्हणजे पर्जन्यसूक्तेच आहेत. या कविता अभ्यासल्या तर भोवतालचा निसर्ग आपल्याला वेगळाच भासेल. काहीजण म्हणतील, बोरकरांच्या कवितेतील निसर्ग आज कुठे आहे? मोडका पूल अन् तांबडा रस्ता कुठे आहे? सगळे रस्ते ‘हॉटमिक्स’! घरांच्या बाबतीत काय लिहावे? पावसात तर ‘घरे कांबळी ओढून| टक लाविती मुकाट|’ असे शब्दचित्र बोरकर रेखाटतात. ही शब्दचित्रे आजच्या मुलांना कळतील का?
खिडकीतला पाऊस
सगळेच ऋतू आपण खिडक्यांमधून पाहू लागलो आहोत. पहिला पाऊस पडून गेल्यानंतरचा मृद्गंध आता जाणवत नाही. इंदिरा संतांना तर तो एखाद्या विशुद्ध भावकवितेसारखा वाटतो. गो. वि. करंदीकरांना पहिल्या पावसाची भाषा गूढ वाटते. पाऊस पाहणे हा एक आनंदसोहळा होता. पूर्वी सलग पाऊस पडला की पूर यायचा. पुराचे पाणी पाहायला माणसे घराबाहेर पडत. आज ‘धबाबा’ कोसळणारे पाणी पाहायला माणसे जातात. तिथे जाऊन काहीजण दंगामस्ती करतात, अशा बातम्यादेखील वरचेवर वाचनात येतात.
नको नको रे पावसा….
पाऊस म्हणजे चैतन्य, पाऊस म्हणजे उत्साह वगैरे खरेच आहे. पण हाच पाऊस काहीवेळा नकोसा वाटतो. ‘असा मत्त पाऊस यावा मृगाचा’ अशी अपेक्षा वसंत सावंतांसारखे कवी करतात तर इंदिरा संत त्याला सांगतात–
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
अन् दारात सायली
चैतन्य घेऊन येणार्या पावसामुळे गोरगरिबांचे मात्र नुकसान होत असते. दया पवारांची ‘पावसा, पावसा तू आलास’ ही कविता वाचली म्हणजे हा पाऊस चैतन्याऐवजी दुःखच घेऊन येतो असे वाटू लागते. पवारांच्याच शब्दांत सांगावयाचे झाले तर–
पावसा, पावसा तू आलास
छप्पर लागे घनघोर गळतीला
चिखलात चिल्यापिल्यांची पाटी
भुकेपोटी लागली वळवळायला
असा हा पाऊस अन् असा हा निसर्ग. पावसाची किती म्हणून रूपे सांगावीत. ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही| सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले’ हे आणखी एक रूप. पाऊस आपल्याला सुखी करतो.
जोवर पाऊस पडतो जगात|
वेडा मोर नाचतो वनात|
पहाटेची किरणे भुलून|
हिरे वेचीत फिरतो तृणात|
तोवर सुखास अंत नाही॥
वगैरे ठीक आहे. पण हा पाऊस दुःखाची जाणीवही करून देतो. पाऊस बालकवी, बोरकर, महानोर, पाडगावकर यांचा आहे, तसाच तो ग्रेस यांचाही आहे. बालकवी–बोरकर–महानोर वगैरे कवींच्या कवितेत आपण कधी तल्लीन होऊन जातो कळत नाही. ‘हलकेच’ आपण भानावर येतो तेव्हा आठवतो कवी ग्रेस यांचा हा पाऊस–
पाऊस कधीचा पडतो
झाडाची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दुःखाच्या मंद सुराने….