पाऊस आणि निसर्ग

0
116
  • अक्षता नार्वेकर (शासकीय कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, साखळी)

पावसाचा हात धरून
पळत सुटावं माळरानात…
मनातलं गुपित-
हळूच सांगावं वाऱ्याच्या कानात…

रानातल्या निर्झरासोबत
लहान मुलागत बागडावं…
धो धो हसणाऱ्या धबधब्याच्या मिठीत
डोळे मिटून शिरावं…

असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण पावसातील निसर्ग हा मनाला एक वेगळंच समाधान देतो. पाऊस हा मोठा जादूगार आहे. पावसाळ्यापूर्वी उन्हाळ्यात निसर्ग होरपळून निघालेला असतो. तापलेली जमीन, भुंडे डोंगर, निष्पर्ण वृक्ष- सगळेजण पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी सारा निसर्ग मोठ्या उत्साहाने पहिल्या पावसाचे स्वागत करतो. विशेषतः जेव्हा अनपेक्षित दिवशी पाऊस पडतो तेव्हा ते अधिक रोमांचक होते. आपल्या जीवनात त्याचा विशेष अर्थ आहे.
पाऊस म्हटला की सर्वप्रथम आठवतो तो आभाळ भरून आलेला काळाकुटृ ढग. हळूहळू गडगडाट करत, विजा चमकावत येणारा पाऊस आपल्या जीवनात नवे रंग भरतो. पावसाळ्यात धरतीला नवीन जोम येतो. पहिल्या सरींनी मातीतील गंध दरवळतो. तृप्त झालेली भूमी आसमंत गंधीत करते. साऱ्या वातावरणात एक चैतन्य फुलून येते. निसर्गातला हा अनोखा उत्सव प्रत्येकाच्या मनाला प्रसन्नता देतो. शेतकरी आपल्या शेतीची तयारी करायला सुरुवात करतात, धरणे भरून येतात, नद्या-नाले ओसंडून वाहू लागतात. तळी, विहिरीमध्ये पाण्याचा साठा वाढतो. झाडांवर, पानावरून ओघळणारे पाण्याचे थेंब एक वेगळीच काव्यात्मक अनुभव देतात. प्रत्येक पानावरून ओघळणाऱ्या थेंबात एक वेगळीच लय असते. धरतीचा हिरवा शालू पाहून मन आनंदित होते. पावसाळ्यात पक्षीही आनंदी आणि तृप्त झालेले आढळतात. भिजलेले पंख फडफडवत ते आपल्या घरट्यातून ये-जा करीत असतात.

डोंगराच्या कुशीतून धबधबे कोसळतात, रस्त्यावर पावसाच्या सरींनी जलधारा वाहू लागतात. गावाकडे अंगणात मातीचा गंध, ओसरीवरून पावसाचा नाद आणि खिडकीतून येणारा थंड वारा, हे सर्वच अप्रतिम असते. पावसाळा येताना भरपूर आठवणी घेऊन येतो व जाता-जाता नव्या आठवणी सोबत घेऊन जातो. माणसांमध्येही नव्या उत्साहाचा संचार होतो. चहा-कॉफीचे गरम घुटके घेत गच्चीवर बसून पावसाचे ते दृश्य पाहणे ही एक अविस्मरणीय गोष्ट असते. पावसात मुलांना खेळताना पाहिलं की डोळ्यांसमोर आपलं बालपणच येऊन उभं राहतं. शेवटी, पावसाचं निसर्ग वर्णन हे केवळ शब्दात सांगता येत नाही, ते अनुभवायचं असतं. पाऊस आणि निसर्ग यांच्या अनोख्या संगमामुळे आपलं जीवन संपन्न होतं. निसर्गाच्या अद्भुत कलेचं आपण सर्वांनीच कौतुक करायला हवं आणि त्याचं रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं.