सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांना खंडणीसाठी धमकी प्रकरणातील सहावा संशयित अल्फी साव्हियो लोबो याची येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने सशर्त जामिनावर काल सुटका केली. येथील पोलिसांनी कथित खंडणीप्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांना अटक केली तरी खंडणीप्रकरणाचे गूढ अद्याप कायम आहे.
संशयित अल्फी लोबो याला पंधरा हजार रुपयांची हमी आणि ७ दिवस पोलीस स्थानकावर हजर राहण्याची अट घालण्यात आली आहे. मंत्री पाऊसकर यांच्याकडे ३ कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणीची रक्कम न दिल्यास बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी या खंडणीप्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील पाच व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर, गोव्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या संशयितांच्या मोबाईलवरून खंडणीसाठी संदेश पाठविण्यात आला होता. पोलिसांनी संशयित अल्फी यांच्या घराची झडती घेतली परंतु, सीमकार्ड हस्तगत करण्यात यश प्राप्त झाले नाही.