आपली ४४ वर्षांची वाटचाल यशस्वीरीत्या पूर्ण करून दैनिक नवप्रभा आज ४५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. म्हणजेच आणखी पाच वर्षांनी येणार्या सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे. गोमंतकीय पत्रकारितेमध्ये नवप्रभेचे असलेले स्थान आणि प्रतिष्ठा याविषयी आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नसावी, कारण आजवरच्या या प्रवासाचे आणि प्रगतीचे आपण दैनंदिन साक्षीदार आहात. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आजवर अनेक वादळे आली, आक्रमक मार्केटिंग, अटीतटीची स्पर्धा, सनसनाटीकरणाचा सोस सर्वत्र दिसत असतानाही नवप्रभेचा नंदादीप शांत आणि संयतपणे तेवत राहिला आहे, गोमंतकीय समाजजीवन उजळत राहिला आहे. गेले वर्ष सर्वच माध्यमांसाठी विलक्षण धामधुमीचे वर्ष ठरले. लोकसभा निवडणुकांमध्ये कधी नव्हे एवढी चुरस यावेळी दिसून आली. त्याचा परिणाम प्रचारामध्येही दिसला. नवनव्या आधुनिक प्रचारतंत्राचा वापर या निवडणुकीमध्ये झाला. प्रसारमाध्यमांसाठीही हा काळ खूप कसोटीचा होता. परंतु भोवतालच्या या गदारोळामध्ये कोठेही आपला तोल ढळू न देता वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा पुरस्कार नवप्रभा करीत राहिली. या तटस्थतेमुळेच वाचकांचा दृढ विश्वास आणि प्रेम तिला लाभलेले आहे हे नमूद करण्यास आनंद वाटतो. माध्यमविश्वामध्ये खळबळ माजवणार्या आणखीही काही घडामोडी गेल्या वर्षभरामध्ये घडल्या. फार मोठ्या उद्योगसमूहांनी वृत्तमाध्यमांवर बळकट केलेली पकड, त्याची परिणती म्हणून अनेक नामवंत संपादकांची झालेली गच्छन्ती, माध्यमांच्या या अतिरेकी कॉर्पोरेटायझेशनविषयी पत्रकारांमध्ये निर्माण झालेली चिंता, मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीमुळे छोट्या वर्तमानपत्रांपुढे निर्माण झालेले आर्थिक पेचप्रसंग, अशा अनेक गोष्टींचे पडसाद माध्यम जगतामध्ये गेले वर्षभर उमटत राहिले. या सर्वांचा वेध घेणारे काही मान्यवरांचे अभ्यासू लेख या विशेषांकामध्ये आम्ही आवर्जून समाविष्ट केले आहेत. माध्यमविश्वामध्ये काय चालले आहे, त्याची कल्पना वाचक म्हणून आपल्यालाही असली पाहिजे हा यामागचा दृष्टिकोन आहे. देशातील आणीबाणीला पुढील वर्षी चाळीस वर्षे पूर्ण होतील. वृत्तमाध्यमांच्या दमनाचा तो काळा कालखंड पुन्हा येणे शक्य नाही, परंतु तरीही आज प्रसारमाध्यमांवर अघोषित आणीबाणी लादली जाते आहे की काय असे वाटावे अशा प्रकारचे दबाव आणि दडपणे, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामधून येताना नित्य अनुभवास येत आहेत. न्यायालयांपासून विधिमंडळांपर्यंत सर्वांना माध्यमांवर अंकुश ठेवण्याची गरज भासू लागली आहे. मुद्रित माध्यमे आणि दृक श्राव्य माध्यमे यांच्या नियमनासाठी एक स्वतंत्र अधिकारिणी स्थापन करण्याची शिफारस ‘ट्राय’ ने नुकतीच सरकारला केली आहे. या सगळ्या घडामोडींविषयी माध्यमांचा पाठीराखा असलेला समाज सजग असला पाहिजे असे आम्हाला वाटते आणि म्हणूनच या वर्धापनदिन विशेषांकातील लेखांमधून वाचकांचे त्यासंदर्भात प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. नवीन डिजिटल माध्यमांचा प्रभाव तरूण पिढीवर दिसू लागला आहे. वृत्तवाहिन्या, सोशल मीडियापाठोपाठ आता स्मार्टफोन, टॅॅब्लेटवरील व्हॉटस् ऍप सारख्या संदेशकांच्या वाढत्या लोकप्रियतेमधून ताजी बातमी क्षणार्धात वाचकापर्यंत पोहोचण्याची नवी माध्यमे उपलब्ध झाली आहेत. यातून घडू पाहात असलेल्या डिजिटल क्रांतीचा वेधही या विशेषांकात घेण्यात आला आहे. पत्रकारितेमध्ये कमालीची स्थित्यंतरे जगभरामध्ये घडत आहेत. आर्थिक महसुलाची गणिते वरखाली होऊ लागली आहेत. अशा वेळी भविष्यात येऊ घातलेल्या बदलांची चाहुल घेत घेत माध्यमांना आणि वाचक – प्रेक्षकांना पुढे जावे लागणार आहे. बदल काही एकाएकी घडत नसतो. हळूहळू स्थित्यंतरे घडत असतात, नवी समीकरणे रुजत असतात. जुनी कालबाह्य ठरत असतात. काळासरशी स्वतःला बदलत बदलत पुढे जात असताना मूलतत्त्वांचे विस्मरण पडूनही चालत नाही. हे भान ठेवूनच नवप्रभेची यापुढील वाटचाल असेल. सुवर्णमहोत्सवाच्या दिशेनेे नव्या उत्साहाने पावले टाकत असताना आपल्या सर्वांच्या साथीने यापुढे अधिक दमदार वाटचाल करण्याची ग्वाही आम्ही देत आहोत. आपले प्रेम, आपला विश्वास असाच कायम राहू द्यात!