पाऊले चालती पंढरीची वाट…!

0
14
  • इंदू लक्ष्मण परब
    (श्री शांतादुर्गा हायस्कूल, डिचोली)

ज्येष्ठ संपत आला की सर्वांनाच ओढ लागते ती विठुरायाची. ज्येष्ठाचा पाऊस सुरू झाला आणि वारकरी मंडळी निघाली विठुरायाच्या भेटीला. शेकडो भाविक आपल्या घरादाराची चिंता सोडून पंढरपूरची वाट चालतात. विठुराया कमरेवरती हात ठेवून या आपल्या भक्तांची वाट कितीतरी दिवस पूर्वीच पाहत असतो.
हातात टाळ आणि गळ्यात माळ घालून, मुखातून विठ्ठल नामाचा जप करत हे वारकरी पायी पंढरपूर गाठतात. त्यात एकमेकांप्रति राग, मत्सर नसतो; फक्त असते ती विठुरायाची भक्ती. म्हणूनच तर प्रत्येकजण एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात. त्यात उच्चनिच्चतेचा भाव नसतो, कोणी गरीब-श्रीमंत नसतो, सगळेच प्रेमभावाने- विठ्ठलाच्या ओढीने चाललेले असतात.
विठुरायाची नगरी कितीही दूर असली तरी प्रेमभावाने तिथपर्यंत सर्व जातात. एरव्ही सदैव मार्गदर्शनासाठी उभा असलेला विठुराया आपल्या भक्तांची ‘माऊली’ बनून जातो. असेही म्हणतात की, एकादशीच्या दिवशी तो मंदिरात उभा नसतोच. तो असतो प्रत्येकाच्या उदरी. तिथे असलेला प्रत्येकजण विठुराया बनून जातो म्हणूनच तिथे राग, द्वेष, मत्सर नसून एकमेकांप्रति आदर-सन्मान असतो.
प्रत्येक देवताने हातात शस्त्र घेतले व मार्गदर्शन केले; पण विठुराया मात्र आईप्रमाणे कमरेवर हात ठेवून जगाला उपदेश देण्यास उभा राहिला. तुकाराम महाराज, जनाबाई आदी संतांच्या घरात जाऊन त्याने त्यांचे काम केले. विठुराया फक्त एका धर्माचा, एका समाजाचा नसून प्रत्येकाचा सगासोयरा आहे, प्रत्येकाची जननी आहे, याची शिकवण त्याने जगताला दिली. प्रत्येकाच्या हृदयात आपले अस्तित्व टिकवण्याचे कार्य कितीतरी काळापासून तो करत आहे. म्हणूनच तर तो जगाची आई बनला.
लाखो भक्तगण फक्त एका आशेने आज तिथे जात आहेत- विठुरायाची माया आपल्याला मिळेल म्हणून. आईच्या मायेचा सोस प्रत्येकालाच असते. तीच माया अनुभवण्यासाठी वारकरी त्याच्या भेटीला निघतात. ‘सावळा हा विठ्ठल’ अशी उपमा अनेक ग्रंथांमध्ये, अभंगांमधून त्याला दिली गेली. विठुरायाच्या प्रत्येक गोष्टीतून शिकवण या समाजाला मिळाली. सर्वजण एकच आहे ही महत्त्वाची शिकवण या माऊलीनेच समाजाला दिली.
‘अवघी दुमदुमली पंढरी’ हा जयघोष अभंगातून प्रत्येकाच्या मनात पोहोचला व त्यातूनच वारकरी पायी वारीला निघाले. प्रत्येक वारकरी हा विठ्ठलमय बनूनच चालत जातो. म्हणूनच त्याच्या डोळ्यात माऊलीचे तेज झळकत असते.
गोव्याहूनही अनेक वारकरी पंढरीला निघतात. विठ्ठल फक्त एका प्रांतापुरता, प्रदेशापुरता मर्यादित नसून तो अखंड विश्वाचा त्राता आहे. अठ्ठावीस युगे तो मार्गदर्शन करीत आहे.