पांडुरोगात पंचकर्म लाभदायी

0
431
  • डॉ. सुरज स. पाटलेकर(श्रीव्यं्‌कटेश आयुर्वेद, मडगांव)

 

रक्तनिर्मितीस कारणीभूत असणार्‍या अवयवांच्या विकृतीमुळे, रक्ताच्या निर्मितीस आवश्यक असे पदार्थ (लोह, ताम्र, मँगनीज इ.) आहारातून कमी प्रमाणात मिळाल्याने, कोणत्याही कारणाने शरीरातून अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने, अस्थिमज्जेतील (बोन मॅरो) विकृतीमुळे ऍनीमिया म्हणजेच पांडुरोग उत्पन्न होतो.

 

पांडुरोगाची तुलना आधुनिक वैद्यकशास्त्रातील वर्णित ऍनिमियाशी केली जाते. पांडुरोगामध्ये त्वचा, नख व डोळ्यांच्या पापणीच्या आतील बाजुस पांडुता येते म्हणजेच पांढुरका रंग येणे किंवा सफ़ेद, फिकट, निस्तेज होते. त्वचेची कांति नष्ट होते, त्वचा प्रभाहीन होते. आयुर्वेदाप्रमाणे बेडकाची त्वचा जशी निस्तेज व रूक्ष/कोरडी असते तशीच त्वचा पांडु झालेल्या रोग्याची दिसु लागते.

पांडुरोगाच्या उत्पत्तीस त्रिदोषांचा प्रकोप कारणीभूत आहे.. असे आयुर्वेद सांगतो, मग ते दोष कारणांमुळे स्वतंत्रपणे वाढु लागतात किंवा सगळे एकत्र येऊन. ह्याच्या व्यतिरिक्त पांडुचा अजुन एक प्रकार सांगितला आहे तो म्हणजे मृद्भक्षणज पांडु (जो माती खाल्ल्याने होतो).

अतिप्रमाणात आंबट (कैर्‍या,लिंबु इ.), खारट (मीठ इ.) चवीचे पदार्थ, गुणाने उष्ण/शरीराला गरम पडणार्‍या, स्वभावाने विरुद्ध अश्या पदार्थांचे (केळी व दुध, दुध व मासे, फळे व दुध, गरम व थंड इ.) एकाचवेळी सेवन केल्याने, शरीराला घातक व असात्म्य अश्या गोष्टी खाल्ल्याने पांडुरोग उत्पन्न होतो. आहारामध्ये विशेषतः पावटे, उडिद, तीळ व तीळाचे तैल हे अतिमात्रेमध्ये सेवन केल्याने, अम्लपित्तचा (आंबट ढेकर येणे, छातीमध्ये जळजळ) त्रास असतानाही जेवणे, दुपारच्या वेळेस अधिक काळ झोपणे, रात्रीचे जागरण करणे, अतिप्रमाणात व्यायाम करणे (ह्यात जिम किंवा व्यायामशाळेमध्ये जाणार्‍या व्यक्तिनां विशेषकरुन जे इतराना प्रभावित करण्यासाठी, इतरांपेक्षा जास्त व्यायाम करण्यासाठी गरज व मर्यादेपेक्षा आराम न घेता अधिक व्यायाम करतात), शारिरीक सम्बंध न ठेवणे, वेगांचा अवरोध करणे (लघवी, मल, वांती इ. वेग होत असताना त्यांना न होऊ देणे, मुद्दाम रोखुन ठेवणे), चिंता, रागराग (क्रोध), शोक करत बसणे, सतत भीति वाटत राहणे ज्याने मनावर आघात होतो ह्या गोष्टीही तेवढयाच कारणीभूत ठरतात.

पांडुमध्ये रक्तधातु कमी होणे ही महत्वाची घटना असते. रक्तपोषणास आवश्यक असणारी घटकद्रव्ये आहारातून न मिळणे ह्यामुळे पांडुरोग हा जन्मास येतो. तसेच शरीरातुन किंवा शरिरामध्ये जर रक्तस्राव झाला (मग तो मुळव्याध, एखादा व्रण/जखम, आघात, मासिक पाळीच्या वेळेस अतिमात्रेत रक्तस्राव होणे असेल किंवा एखादी रक्तस्राव न थांबणारी व्याधीमध्ये) तर रक्ताच्या कमतरतेमुळेही पांडुरोग होतो. पहायला गेले तर लक्षात येईल की वरील हेतूंमुळे प्रकोपीत झालेले दोष हे काहीही झाले तरी पित्ताची दुष्टीच अधिक प्रमाणात करतील व हे पित्त हृदयातुन सर्व शरिरामध्ये जेथे जाईल तेथे लक्षणे उत्पन्न करेल.

शरीरातील सर्व धातुंमध्ये एक प्रकारचे शैथिल्य येते (ते शिथिल, ढीले होऊ लागतात), मनोदैन्य येते (कसलीही इच्छा होत नाही, नेहमीच दुःखी राहणे), शरीर भारी व जड वाटणे, सर्व धातुंची उत्पत्ति नीट होत नसल्याकारणाने शरिरामध्ये बळ, ताकतच नाही असे वाटत राहणे, रूक्षता-कोरडेपणामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होत राहणे, वर्ण बदलणे, शरीर स्थिर व प्रसन्न न राहणे, इन्द्रियांचे अर्थग्रहणाचे कार्य व्यवस्थित व त्यांचेकडुन योग्यप्रकाराने होणे (म्हणजेच ऐकु व गंध नीट न येणे, जिभेची चव जाणे, अस्पष्ट  दिसणे), धातुंचा क्षय झाल्याने (खासकरुन रक्त व मेद धातु) वजन पण कमी होत जाणे, बारीक होणे ह्या तक्रारी असतात.

पांडुरोगाच्या पुर्वरुपामध्ये (म्हणजेच प्रमुख लक्षण दिसण्यापूर्वीच्या अवस्थेमध्ये) त्वचा कोरडी होणे व भेगा पडणे, परत परत थुंकणे, अंग दुखणे, डोळ्यांच्या भोवती सुज येणे, हृदयाची धडधड वाढणे, मल व मूत्र हे एकदम पिवळसर रंगाचे होणे, अन्नाचे व्यवस्थित पचन न होणे, घाम कमी येणे, माती खाण्याची इच्छा (विशेषतः लहान मुलांमध्ये व गरोदर स्त्रियांमध्ये वात, पित्त व कफ या दोषांनुसार अनुक्रमे तुरट, खारट व गोड माती खाण्याची इच्छा होत असते. ही रूक्ष माती आहारामध्ये, सर्व धातु व शरिरामध्ये रूक्षता आणते आणि सर्व सूक्ष्म स्रोतसांमध्ये अवरोध करुन तेथील पोषण थांबवते) ही लक्षणे दिसतात.

प्रमुख लक्षणांमध्ये वरील उल्लेखित लक्षणांच्या (त्वचा-नख-नेत्र सफ़ेद, निस्तेज, प्रभाहीन होणे इ.) व्यतिरिक्त कानामध्ये चित्रविचित्र आवाज ऐकु येणे, भुक न लागणे, मरगळ, अन्न खाण्याची इच्छा न होणे किंवा अन्नाचा द्वेष करणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे, ताप येणे, धाप लागणे, पुर्ण अंगामध्ये टोचल्यासारखी वेदना असणे, पायाच्या पोटर्‍या जखडल्याप्रमाणे वाटणे, कंबर-पाय-मांड्यांच्या ठिकाणी वेदना, गळून गेल्याप्रमाणे वाटणे, अल्पश्रमानेही श्वास लागणे, केस गळणे, चिडचिडेपणा वाढणे, नेहमी त्रासिक दिसणे/वाटणे, कमी बोलावेसे वाटणे, झोप फार येणे, गार पदार्थांचा द्वेष असणे (पित्तज पांडुमध्ये गार पदार्थ हवेहवेसे वाटु लागतात) ही लक्षणे असतात.

नख, त्वचा, डोळे, मलमूत्रांचा रंग दोषांप्रमाणे (जो दोष प्रबल असेल त्या प्रमाणे) रंग (वात दोषामुळे काळपट, पित्तदोषामुळे पिवळसर व कफदोषामुळे पांढुरका/सफेद) बदलत जातो. वातामुळे अंगाला कंप असतो, डोकेदुखी, पाठदुखी, पोट फुगल्यासारखे वाटणे, शौचाला घट्ट होणे. पित्तामुळे अंगाची  लाही लाही (जळजळ होणे), तहान खुप लागणे, ताप येणे, चक्कर येणे, घाम जास्त येणे, तोंड कडुवट होणे, आंबट ढेकर येणे, मलप्रवृत्ति पातळ व दुर्गंधीत असणे, डोळयासमोर अंधारी आल्यासारखे वाटते. कफामुळे झापड येणे, वांती होईल असे वाटणे, लाळ गळणे, खोकला येणे, तोंडाला चव नसणे, शब्दोच्चार व्यवस्थित न होणे व तिखट, कोरडे आणि गरम खाण्याची इच्छा होत राहणे.

ह्यात जर सर्व दोषांचा समावेश असेल तर सगळ्यांची लक्षणे एकत्र दिसतील.

मृद्भक्षणजन्य पांडुमध्ये डोळ्यांच्या भोवती, भुवयांच्या वर, पायांवर, नाभिप्रदेशी, लिंगप्रदेशी सुज पसरत व वाढत जाते. मलविसर्जन पातळ, सरक्त व फेनिल(फेसाळ) होऊ लागते. व पोटात कृमि उत्पन्न होतात. जर वेळेत उपचार, चिकित्सा केली गेली नाही तर सर्व लक्षणे घोर व्याधीमध्ये (कावीळ, हृद्रोग इ. सारख्या) रूपांतरित होऊ लागतात. सुज ही गुद व अंडकोषाच्या ठिकाणीही पसरू शकते.

आयुर्वेदानुसार दोषांचे मृदु किंवा तिक्ष्ण शोधन करणे महत्वाचे. त्यासाठी वमन, विरेचनसारखे पंचकर्म खुप उपयोगी ठरतात. पण रुग्णाचे बळ, दोषांची अवस्था, काळ, ऋतु, औषधाची मात्रा इ. सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आणि तेही तज्ञ चिकित्सकांच्या सल्ला व मार्गदर्शनातच. तुप/घृत हे पांडुमध्ये उत्तम कार्य करते व ते योग्य औषधीयुक्त असल्यास अधिक उत्तम. अगोदर निदानपरिवर्जन करावे म्हणजेच ज्या गोष्टी कारणीभुत आहेत त्या खाणे वा करणे थांबवावे, त्यांचा त्याग करणे महत्वाचे. अती प्रमाणात रक्तक्षय झाल्यास बाहेरील रक्ताची(ब्लड ट्रांसफ्यूजन)गरज पडु शकते, अर्थातच योग्य रक्तगट पाहुनच. आहारामध्ये गहु, जव, मसूर, तुर यांचे कढण, डाळिंब, तुप सारख्या गोष्टी खाव्यात.

आधुनिक व अर्वाचिन शास्त्रानुसार ऍनीमियामध्ये रक्तातील लालपेशी किंवा रक्तकणांमधील असणार्‍या हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी हे ऍनीमियाचे प्राथमिक व प्रधान लक्षण आहे. या लालकणांची संख्यात्मता व विकृत स्वरुपता यामुळेही ऍनीमियाची उत्पत्ती होऊ शकते. रक्तनिर्मितीस कारणीभूत असणार्‍या अवयवांच्या विकृतीमुळे, रक्ताच्या निर्मितीस आवश्यक असे पदार्थ (लोह, ताम्र, मँगनीज इ.) आहारातून कमी प्रमाणात मिळाल्याने, कोणत्याही कारणाने शरीरातून अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने, अस्थिमज्जेतील (बोन मॅरो) विकृतीमुळे ऍनीमिया उत्पन्न होतो.

हीमोग्लोबिन हे रक्तातील लाल पेशींमधिल एक प्रकारचे प्रोटीन आहे जे ऑक्सिजन शरीरातील अवयव व सूक्ष्म सेल्स, पेशीपर्यंत पोहोचविते व तेथील कार्बन डायऑक्साईड शुद्धीकरणासाठी फुफ्फुसामध्ये आणते. पुरूषांमध्ये हीमोग्लोबिनचे प्राकृत प्रमाण १३.५ ते १७.५ ग्रॅम्स पर डेसीलिटर एवढे तर स्त्रियांमधे ते १२.० ते १५.५ ग्रॅम्स पर डेसीलिटर एवढे असले पाहिजे.

यकृत, वृक्क ह्यांच्या विकारामध्ये,  आयर्न (लोह)डेफिसीएन्सी, विटामिन-बी१२ डेफिसीएन्सी, फॉलेट डेफिसीएन्सी, रक्तस्राव, हायपोथायरॉयडीजम, थेलीसेमिया, कर्करोग(ल्यूकेमिया) मध्ये ही हीमोग्लोबिन कमी होऊ शकते. तसेच जास्त शारिरीक कसरत, धुम्रपान, ऊंच डोंगराळ ठिकाणी राहणे, खुप उल्ट्या होणे, जळल्याने, डीहायड्रेशन, पोलीसायथेमिया वेरा, फुफ्फुस विकार सारख्या अवस्थेमध्ये हीमोग्लोबिन विकृतरित्या वाढलेले आढळेल.