पहिल्या टप्प्यात 18 खनिज डंपचा ई-लिलाव; 200 कोटी मिळणार

0
4

>> खाण खात्याच्या संचालकांची माहिती; 22 ते 24 जानेवारीदरम्यान होणार लिलाव

राज्य सरकारने खनिज डंपचा ई-लिलाव निश्चित केला असून, पहिल्या टप्प्यात 18 खनिज डंपचा लिलाव केला जाणार आहे. या खनिज डंपच्या लिलावातून 200 कोटींचा महसूल अपेक्षित आहे. खनिज डंप ई-लिलावासाठी 172 निविदा कागदपत्रे बोलीधारकांकडून खरेदी करण्यात आली आहेत. खनिज डंप ई-लिलावाला भरघोस प्रतिसाद लाभला असून, बोली लावण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी अशी आहे. येत्या 22 ते 24 जानेवारी या काळात खनिज डंपचा ई-लिलाव केला जाणार आहे, अशी माहिती खाण खात्याचे संचालक नारायण गाड यांनी काल दिली.

राज्य सरकारने खनिज डंप धोरणामध्ये दुरुस्ती करून राज्यभरात पडून असलेल्या खनिज डंपचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात खनिज डंप पडून असल्याचे आढळून आले असून, खनिज डंपचा आढावा घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात 18 खनिज डंपचा ई-लिलाव केला जाणार आहे. खाण खात्याच्या वेबसाईटवर 18 खनिज डंपची सविस्तर माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

खाण खात्याने खनिज डंपचा आढावा घेऊन अहवाल तयार करण्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती केली होती. या एजन्सीने विविध भागांतील खनिज डंपचे नमुने घेऊन तपासणी केली आहे. खनिज डंप 45 ते 50 ग्रेडच्या दरम्यान आहे. खनिज डंपच्या ग्रेडनुसार दर निश्चित करण्यात आला आहे. काही खनिज डंप 4 ते 5 हेक्टरमध्ये आहेत, तर सर्वांत मोठा खनिज डंप 25 हेक्टरमध्ये आहे. या खनिज डंपच्या लिलावातून पहिल्या टप्प्यात सुमारे 200 कोटी रुपयांची महसूल मिळण्याची शक्यता आहे. खनिज डंप ई-लिलावासाठी खनिज कंपन्याकडून सादर निविदांची छाननी केल्यानंतर नियमानुसार असलेल्या निविदा अंतिम लिलावासाठी स्वीकारल्या जाणार आहेत, अशी माहिती गाड यांनी दिली.