पहिल्या टप्प्यात दोन महिने नारळविक्री

0
150

>> मुख्यमंत्री : पणजी, मडगावातील फलोत्पादन केंद्रांवर नारळ विक्री सुरू

राज्यातील सत्तरी, सांगे, केपे, काणकोण या तालुक्यातील माकडांनी उच्छाद घालून नारळ पीकाची नासधूस केल्याने नारळ उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आल्तिनो पणजी येथे काल दिली. गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाच्या सवलतीच्या दरातील नारळ विक्रीचा आल्तिनो-पणजीतील केंद्रावर शुभारंभ केल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, महामंडळाचे अध्यक्ष, आमदार प्रवीण झांट्ये, माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर, कृषी खात्याचे संचालक नेल्सन फिग्रादो, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव केळकर आदी उपस्थित होते.
राज्यात नारळाची आवक कमी झाल्याचा काही जण गैरफायदा घेत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले की, देशातील आंध्रप्रदेश, तामिलनाडू, कर्नाटक, केरळ या भागातील दुष्काळामुळे नारळ उत्पादनावर परिमाण झाला आहे. त्यामुळे परराज्यातील नारळाची आवक कमी झाली आहे, असेही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
नारळाच्या वाढलेल्या किेमतीपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी माफक दरात नारळाची विक्री केली जात आहे. पहिल्या टप्प्यात दोन महिने नारळांची विक्री केली जाणार आहे. त्यानंतर बाजारातील नारळाच्या स्थितीचा आढावा घेऊन योजना पुढे चालविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

फलोत्पादन मंडळाच्या राज्यातील सर्व भाजी विक्री केंद्रावर येत्या दोन ते चार दिवसात नारळ विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत, असे माधव केळकर यांनी सांगितले.
ग्राहकांना गॅस कार्डावर ३० नारळ सवलतीच्या दरात दोन हप्त्यातून दिले जाणार आहेत. पहिल्या हप्त्यात १५ आणि दुसर्‍या हप्त्यात १५ नारळांची विक्री केली जाणार आहे. नारळ विक्रीची गॅस कार्डावर नोंद केली जाते. भाजी विक्री केंद्रावर लहान, मध्यम व मोठे अशा तीन प्रकारातील नारळ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. लहान नारळाची किंमत १५ रूपये, मध्यम नारळाची किंमत १८ रूपये आणि मोठ्या नारळाची किंमत २० रूपये अशी आहे, अशी माहिती फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक केळकर यांनी सांगितले.राज्यातील नारळ बागायतदाराकडील नारळाची थेट खरेदी केली जाणार आहे. बागायतदारांनी नारळ सोलून महामंडळाच्या तालुका पातळीवरील खरेदी केंद्रात आणून देण्याची गरज आहे, असे केळकर यांनी सांगितले.
‘ना नफा ना नोटा’ या तत्त्वावर नारळाची विक्री सुरू करण्यात आली आहे. दोन महिने नारळाची विक्री केली जाणार आहे. त्यानंतर नारळाच्या बाजारातील दराचा आढावा घेऊन योजना सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे दीड लाख नारळांची खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण झांट्ये यांनी दिली.

नारळ संरक्षणासाठी रसायन
माकडापासून नारळ व इतर बागायत पिकांचे संरक्षण करण्यासाठी ओल्ड गोवा येथील आयसीआरच्या शास्त्रज्ञानी ‘ऑर्गेनिक रिबेलट’ नामक नवीन प्रतिबंधात्मक रसायन विकसित केले आहे. या रसायनाची चाचणी आयसीआरच्या बागायतीमध्ये घेतली जाणार आहे, अशी माहिती शेतकी खात्याचे संचालक नेल्सन फिग्रादो यांनी दिली. या रसायनाची बागायतीच्या चहुबाजूनी फवारणी केल्यानंतर रसायनाच्या वासामुळे माकड बागायतीमध्ये प्रवेश करणार नाहीत, असा संशोधकांचा दावा आहे. बागायतीच्या बाजूला मोठी झाडे असता कामा नये, अन्यथा झाडावरून माकड बागायतीमध्ये येऊ शकतात. कर्नाटकातील येल्लापूर, शिर्शि या भागात बागायतदार माकडाचा उपद्रव रोखण्यासाठी एका रसायनाचा वापर करतात. परंतु, या रसायनाच्या प्रभावाबाबत साशंकता व्यक्त होत आहे, असे फिग्रादो यांनी सांगितले.

 

दहा हजार नारळांची पहिल्या दिवशी विक्री

नारळाचा तुटवडा निर्माण झाल्याने गोव्यात नारळाचे भाव वाढले आहेत ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होईपर्यंत फलोत्पादन महामंडळ व कृषी खात्यातर्फे त्यांच्या आस्थापनांतून स्वस्त दरांत विक्री केली जाईल. काल एकुण १० हजार नारळ विक्री करण्यात आल्याचे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. फातोर्डा बांधकाम खात्याजवळ स्वस्त नारळ विक्रीचा शुभारंभ करण्यात आला.

एलपीजी गॅसधारक ग्राहकांना दर पंधरवड्याला प्रत्येकी १५ नारळ स्वस्त दरांत फलोत्पादन महामंडळातर्फे वितरीत केले जाणार आहेत. छोटे नारळ १५ रुपयेमध्यम आकाराचे १८ रुपये व मोठे प्रत्येकी २० रुपये या दरात दिले जाणार आहेत. आपण एक फेब्रुवारीपासून स्वस्त दरांत नारळ देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याची कार्यवाही केल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

गोवा सरकारने भाव नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येईल. चैनय व केरळ येथे नारळाच्या हायब्रीड फार्मला कृषी व फलोद्यान मंडळाचे अधिकारी व शेतकर्‍याना नेऊन पहाणी करण्याचा विचार असल्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यानी सांगितले. आज बर्‍याच लोकांनी नारळ स्वस्तात घेतले. त्यावेळी कृषी व फलोद्यान महामंडळाचे अधिकारी नगराध्यक्षा डॉ. बबिता प्रभु देसाई, फातोर्डा फॉरवर्डचे नगरसेवक उपस्थित होते.