पहिल्याच दिवशी अपघातांत चौघे ठार

0
14

>> मळा-पणजी, ताळगाव, भोम-फोंडा आणि वाळपई येथे अपघाताच्या चार घटना; मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात काल पणजी, ताळगाव, भोम-फोंडा आणि वाळपई येथे झालेल्या वाहन अपघातांत चौघा जणांचा मृत्यू झाला. पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मळा येथील अपघातात माजी नगरसेवकाच्या 21 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला, तर ताळगावातील अपघातात छत्तीसगढच्या 23 वर्षीय तरुणाचा बळी गेला आणि दोघे जण जखमी झाले. वाळपई येथील अपघातात फोंडा पोलीस स्थानकात कार्यरत 32 वर्षीय पोलिसाला आपले प्राण गमवावे लागले, तर भोम येथील अपघातात आसामचा 31 वर्षीय तरुण मृत्यूमुखी पडला.

पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत मळा पणजी येथे मलनिस्सारण टाकी बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास बुलेट मोटरसायकल कोसळून झालेल्या अपघातात दुचाकीचालक आयुष हळर्णकर (21 वर्षे, रायबंदर) या युवकाचा बळी गेला. आयुष हा पणजी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रुपेश हर्ळणकर यांचा मुलगा होता. पहाटेच्या वेळी आयुष हळर्णकर याला रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली. या अपघातात आयुष गंभीर जखमी झाला होता. त्याला त्वरित बांबोळी येथील गोमेकॉमध्ये नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. या अपघातामुळे हळणृकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

स्मार्ट सिटीच्या बेशिस्त कामामुळे आणखीन एका बळी गेल्याचा आरोप केला जात आहे. स्मार्ट सिटीतील बेशिस्त कामामुळे नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. मळा पणजी येथे पीपल्स विद्यालयाजवळ स्मार्ट सिटी अंतर्गत मलनिस्सारण वाहिनीसाठी टाकी बांधण्यासाठी मुख्य रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला आहे. त्या खड्ड्याच्या ठिकाणाचे पथदीप दोन दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. याबाबतची माहिती संबंधित ठेकेदार आणि स्मार्ट सिटीच्या कामाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्याला देण्यात आली होती; तथापि रात्रीच्या वेळी सदर ठिकाणी अपघात घडू नये म्हणून वाहनचालकांना सावध करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती.
महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मळा येथील अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. मंत्री मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीच्या संबंधित अधिकारी रश्मी शिरोडकर यांच्याशी अपघात प्रकरणी चर्चा केली. तसेच कामांच्या ठिकाणी आणखीन दुर्घटना होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना आखण्याची सूचनाही केली. पणजी महानगरपालिकेचे नगरसेवक उदय मडकईकर यांनी या अपघाताला स्मार्ट सिटीचा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. दरम्यान, मळा पणजी येथील अपघात प्रकरणी चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

ताळगावात दोन दुचाकींमध्ये
अपघात; एक ठार, दोघे जखमी

ताळगाव येथे काल सकाळी साडे सहाच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. या अपघातात जिव्यांश लकरा (23 वर्षे, मूळ रा. छत्तीसगड) याचे निधन झाले.
तसेच, अपघातात दीपक नौजंशी (24 वर्षे, रा. मूळ नेपाळ) आणि कपाल कुजूर (20 वर्षे, रा. करंजाळे) हे दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करण्यात आले.

भोम अपघातातील जखमीचे निधन
भोम-फोंडा येथे 31 डिसेंबरच्या रात्री झालेल्या अपघातातील जखमी दुचाकीचालक प्रतिम बोरा (31 वर्षे, मूळ रा. आसाम) याचे गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना काल सकाळी निधन झाले. प्रतिम याचा वाहनावरील ताबा सुटल्याने दुचाकीची विजेच्या खाबांला धडक दिली होती.

वाळपईतील अपघातात पोलीस ठार

वाळपईतील वाळपई-ठाणे रस्त्यावर काल झालेल्या अपघातात उल्हास गावकर (32, रा. डोंगुर्ली-ठाणे) ह्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. उल्हास गावकर हे फोंडा पोलीस स्थानकात कार्यरत होते.

काल सकाळी साडेसातच्या सुमारास उल्हास गावकर हे आपल्या दुचाकीने (क्र. जीए-04-जे-9241) फोंडा पोलीस स्थानकात ड्युटीवर जाण्यासाठी बाहेर पडले होते, त्यांना 8 वाजता ड्युटीवर रुजू व्हायचे होते. वाळपई वेळुस येथे ते पोहचला असता समोरुन येणाऱ्या कारने (क्र. जीए-07-एल-2009) त्यांच्या दुचाकीला धडक दिली, त्यात ते गंभीर जखमी झाले. कारने दुचाकीला दिलेली धडक एवढी जबरदस्त होती की, त्यात उल्हास गावकर हे दुचाकीबरोबर सुमारे 20 मीटर फरपटत गेले. तसेच कारच्या धडकेनंतर दुचाकीचे तुकडे झाले.
उल्हास गावकर यांना सुरुवातीला वाळपई शासकीय रुग्णालयात, त्यानंतर त्याला गोमेकॉ येथे नेले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाळपई पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी कारचालक गजानन सुहास नाईक (देसाईवाडा ठाणे) याला अटक केली आहे.

गावकर कुटुंबावर शोककळा
उल्हास गावकर हे शांत व चांगल्या स्वभावाचे म्हणून गावात परिचित होते. त्यांचे अडीच वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक दीड वर्षाचा मुलगा आहे. उल्हास यांच्या तरुण वयात अपघाती निधनाने गावकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.