फ्रान्सने काल एका विशेष सोहळ्यात बहुप्रतीक्षित पहिले राफेल जेट लढाऊ विमान भारताला सुपूर्द केले. हे विमान अधिकृतपणे स्वीकारण्यासाठी तेथे गेलेले भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हे विमान स्वीकारल्यानंतर या विमानाची पूजा केली. या सोहळ्यावेळी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली याही उपस्थित होत्या. भारताने ३६ राफेल विमाने खरीदण्यासाठी ५९ हजार कोटी रुपये व्यवहाराची ऑर्डर २०१६ साली दिली होती. ३६ पैकी चार विमाने मे २०२० पर्यंत भारताला मिळणार आहेत.
यावेळी विमानावर ओम रेखाटून विमानावर नारळ ठेवून राजनाथ सिंह यांनी पूजा केली. या विमानाची निर्मिती डसॉल्ट ऍविएशन या फ्रेंच कंपनीने केली असून त्यावर मिटिऑर व स्काल्प क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत.
३६ विमाने टप्प्याटप्प्याने मिळणार
टप्प्याटप्प्याने भारताला एकूण ३६ राफेल जेट विमाने मिळणार आहेत. राफेल लढाऊ विमानांचा पूर्ण ताफा मिळाल्यानंतर भारतीय हवाई दलाची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे असे सांगून भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आहे याकडे राजनाथ सिंह यांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधले.
विद्यमान हवाई दल प्रमुख राकेश भदुरिया हे हवाई दलाचे उपप्रमुख असताना राफेल विमान खरेदी प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याने या पहिल्या विमानावर त्यांची आद्याक्षरे असलेले आरबी ००१ राफेल असा उल्लेख विमानावर करण्यात आला आहे.
राजनाथ सिंह यांचे राफेलमधून उड्डाण
पहिल्याच राफेल जेट विमानातून राजनाथ सिंह यांनी उड्डाणही केले. या विमानातून उड्डाण करण्याची संधी मिळणे हा आपला मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या समवेत एअर मार्शल हरजित सिंग अरोरा हे उपस्थित होते.
ऐतिहासिक दिवस
आजचा दिवस भारत-फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय सामरीक सहकार्य क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. तसेच आजचा दिवस भारतीय संरक्षण दलांसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचेही ते म्हणाले. हा दिवस विजयादशमीचा आणि भारतीय हवाई दल दिवसही असल्याने अनेक दृष्टीकोनातूनही या दिवसाला आगळे महत्त्व आहे असे त्यांनी स्पष्ट केले.