पहिली पसंती ब्राझिललाच

0
75

इतिहास जरी बाजूने नसला तरी मेक्सिकोचा संघ आज विश्‍वचषकाच्या ‘अंतिम १६’ फेरीत बलाढ्य ब्राझिलला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. बलाढ्य ब्राझिलसमोर त्यांचा कितपत निभाव लागतो हे मात्र सामन्याच्या निकालानंतरच कळणार आहे. आपली धक्कादायक क्षमतेची प्रचिती गट फेरीत दाखवून सलग सातव्यांदा त्यांनी विश्‍वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वीच्या सहा प्रयत्नांत त्यांना या पलीकडे मजल मारता आलेली नाही. त्यामुळे किमान यावेळेस तरी दुसर्‍या फेरीतील पराभवाची मालिका खंडित करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पाचवेळच्या विश्‍वविजेत्या संघाविरुद्ध खेळण्यापेक्षा मोठा क्षण नसेल.

संपूर्ण जग ब्राझिलच्या विजयाकडे डोळे लावून बसलेले असताना त्यांना नमविण्यावर आमचा भर असेल, असे मेक्सिकोचा कर्णधार आंद्रेस गुआर्दोदो याने सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हटले आहे. गट फेरीत जर्मनी व द. कोरियाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर स्वीडनकडून दारुण पराभव पत्करावा लागल्याने मेक्सिकोला गटात दुसर्‍या स्थानी समाधान मानावे लागले. यामुळेच त्यांना ब्राझिलसारख्या बलाढ्य संघाशी दोन हात करावे लागणार आहेत. नेमारसारखा स्टार खेळाडू संघात असल्याने ब्राझिलचा संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशासाठी आपले सर्वस्वपणाला लावणार आहे. मार्सेलो व डग्लस कोस्टा दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार असून उजव्या बगलेतील खेळाडू डानिलो या सामन्यासाठी तंदुरुस्त ठरला आहे. ब्राझिल व मेक्सिकोची खेळण्याची शैली परस्परविरोधी असल्याने हा सामना रंगतदार होणार आहे.