पहिली ते आठवीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता

0
32

>> तज्ज्ञांच्या समितीकडून हिरवा कंदील

>> कृती दलाच्या निर्णयाकडे लक्ष

>> १२ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा विचार

देशात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्यातील बंद असलेल्या शाळा आता सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोविडवरील तज्ज्ञ समितीने सरकारला इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग राज्यात सुरू करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. सदर समितीने म्हटले आहे की, राज्यात कोविडची स्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात आहे. पॉझिटिव्हीटी दर एका टक्क्यापेक्षा कमी आहे. आणि नववी ते बारावीचे जे ऑफलाइन वर्ग सुरू आहेत तेथेही कोविड संसर्गाची लक्षणे कुठेही आढळून आली नाहीत. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन सुरू करण्यास हरकत नसावी, असे तज्ज्ञांच्या समितीने म्हटले आहे.

कोविडवरील तज्ज्ञ समितीने वरील इयत्तांचे वर्ग सुरू करण्यास हरकत नसल्याचे म्हटले असले तरी या संदर्भातील पुढील निर्णय घेण्याची जबाबदारी ही कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने स्थापन केलेल्या कृती दलावर असेल.

कोविडवरील तज्ज्ञ समितीने वर्ग सुरू करण्यास हरकत नसल्याचे जे मत मांडलेले आहे त्यावर आता कृती दल काय भूमिका घेते यावर राज्यातील शाळा कधी सुरू होतील हे अवलंबून राहणार आहे.

कोविडवरील तज्ज्ञ समितीमध्ये डॉक्टरांचा भरणा असून कृती दलात प्रामुख्याने प्रशासकीय अधिकार्‍यांचा भरणा आहे. हे कृती दल आता काय निर्णय घेते त्यानुसार शाळा सुरू करायच्या की नाही याचा निर्णय सरकार घेणार आहे. दरम्यान, राज्य सरकार राज्यातील १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्यााबाबत विचार करीत असून त्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची सध्या वाट पाहत आहे.

१२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करताना ज्या मुलांना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, त्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कोविड तज्ज्ञांच्या समितीतील एक सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी काल स्पष्ट केले.

याबाबत बोलताना डॉ. साळकर म्हणाले की, सध्या कोविड पॉझिटिव्हिटीचे प्रमाण सध्या कमी झाले असल्यामुळे शाळा सुरू करण्याची ही वेळ योग्य आहे. मात्र ज्या ठिकाणी हायब्रिड पद्धतीने वर्ग घेणे शक्य आहे त्या ठिकाणी तशा पद्धतीने घ्यावेत असे आम्ही सुचवले आहे. ज्या विद्यार्थ्यांना नेटची समस्या नाही ते विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण चालू ठेवू शकतात असेही साळकर म्हणाले. दरम्यान, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग तसेच महाविद्यालयीन वर्ग सुरू झालेले आहेत. कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत विद्यालयांमध्ये हे वर्ग भरवले जात आहेत.

इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बंद असल्यामुळे या खोल्यांचा वापर करत नववी ते बारावीच्या वर्गासाठी या खोल्यांचा वापर करण्यात येत आहे. मात्र आता सर्वच वर्ग सुरू झाले तर शारिरीक अंतराचे पालन करत विद्यार्थ्यांची बसवण्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी ज्यादा खोल्यांचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी विद्यालयीन व्वस्थापन समितीला त्यावर तोडगा काढावा लागेल.

दरम्यान, आता कृती दलाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे.