पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोव्यात दाखल

0
30

>> दाबोळी विमानतळावर हिंदू संघटनांकडून काळे झेंडे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचे काल गुरूवार दि. २८ ऑक्टोबर रोजी गोव्यात संध्याकाळी पावणेसहा वाजता आगमन झाले. तृणमूलचे लुईझीन फालेरो यांनी बॅनर्जी यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत लवू मामलेदार, सांगेचे प्रसाद गावकर उपस्थित होते. यावेळी दाबोळी विमानतळावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दाबोळी विमानतळाबाहेर येताच ममतांनी नमस्कार केला व सरळ गाडीत बसून निघून गेल्या. यावेळी विमानतळाबाहेर पश्चिम बंगाल येथील सुरक्षा रक्षकांचा मोठा ताफा होता. याव्यतिरिक्त तृणमूल कॉंग्रेसचा एकही कार्यकर्ता नव्हता. ममता बॅनर्जी तीन दिवस गोव्यात असतील. या तीन दिवसांत अन्य पक्षातील काही आमदार तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांचा हा पहिलाच गोवा दौरा आहे.

हिंदू संघटनांकडून काळे झेंडे
त्यानुसार आज दाबोळी विमानतळावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ममता बॅनर्जीच्या निषेधार्थ परशुराम सेना, हिंदू वाहिनी सेना, भगवा हिंदू सेना, बजरंग दल, राष्ट्रीय बजरंग दल, समर्थ गडाचे हिंदूत्व, तसेच इतर वेगवेगळ्या संघटनेच्या हिंदूंनी एकवटून काळे झेंडे दाखवत निषेध केला. यावेळी काही मोजकेच भाजप कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यांना विमानतळ आवारात प्रवेश देण्यात आला नाही. त्यांनी मुख्य रस्त्यावर उभे राहून हातात काळे झेंडे तसेच निषेध फलक घेऊन नारेबाजी करीत निषेध व्यक्त केला.

दरम्यान, वादग्रस्त कार्टूनचे कारण पुढे करून दाबोळीतील ठिकठिकाणचे तृणमूलचे बॅनर्स अज्ञातांनी फाडून टाकले. ममता बॅनर्जी यांच्या फलकांना काळे फासण्यात आले. त्यांच्या आगमानवेळी ठिकठिकाणी जय श्रीरामच्या मंत्रोच्चाराचे फलक लावून अनोख्या पद्धतीने ममता बॅनर्जी यांचे स्वागत करण्यात आले.