गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम किनारपट्टीसाठी यंदा मच्छीमारी बंदीचा काळ समान असेल, असे मच्छीमारी खात्याच्या संचालक डॉ. शामिला मोंतेरो यांनी काल यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्याबरोबर गोव्याचे मच्छीमारी मंत्री आवेर्तान फुर्तादो तसेच कर्नाटक व महाराष्ट्राचे मच्छीमारी मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत तिन्ही राज्यांसाठी मच्छीमारी बंदीचा काळ समान ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. शामिला मोंतेरो यांनी सांगितले. मच्छीमारी बंदी यंदा १ जूनपासून लागू करण्यात येईल व ती ३१ जुलैपर्यंत लागू राहील. गोव्यासाठी गेल्या वर्षीही ही बंदी ६१ दिवसच होती. मात्र, कर्नाटकात ती केवळ ४५ दिवस होती. त्यामुळे ती संपल्यानंतर कर्नाटकातील यांत्रिक बोटींनी गोव्याच्या हद्दीतील समुद्रात येऊन मच्छीमारी करण्याचे सत्र आरंभिल्याने वाद निर्माण झाला होता. कृषीमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत त्यावरही चर्चा करण्यात आल्याचे व यंदा तिन्ही राज्यांसाठी मच्छीमारी बंदीचा काळ समान ठेवण्याचे ठरवण्यात आल्याचे डॉ. मोंतेरो यांनी सांगितले. गोव्यात मच्छीमारी बंदीचा काळ ६१ दिवसांचा असावा यासाठी गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा बंदी काळ लागू करून घेतला होता. केंद्रीय कृषीमंत्र्याबरोबर चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीला आता केंद्रीय संरक्षणमंत्री असलेले मनोहर पर्रीकर हेही हजर होते. त्यांनीही यावेळी चर्चेत भाग घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या, असे डॉ. मोंतेरो यांनी सांगितले. या बैठकीत ‘डीप फिशिंग’ धोरणाबाबतही चर्चा झाली. त्यावर चर्चा करण्यासाठी लवकरच आणखी एक बैठक होणार असल्याचे डॉ. मोंतेरो म्हणाल्या.