पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन

0
7

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआय (एम) नेते बुद्धदेव भट्टाचार्य (80) यांचे काल गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील त्यांच्या घरी निधन झाले. बुद्धदेव भट्टाचार्य वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. काही काळ त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले. गेल्या वर्षीही त्यांना न्यूमोनिया झाला होता. लाइफ सपोर्टवर राहिल्यानंतर तेव्हा ते बरे झाले होते.

बुद्धदेव हे पश्चिम बंगालच्या औद्योगिक क्रांतीसाठी ओळखले जातात. त्यांच्या पश्चात पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना असा परिवार आहे. पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनाबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे.
बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथील बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला.

पश्चिम बंगाल आणि एकूणच देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे आरोग्याच्या कारणास्तव 2000 साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. मुख्यमंत्री असताना भट्टाचार्य यांनी डाव्या पक्षांची आघाडी करून 2001 आणि 2006 च्या निवडणुकीत विजय मिळविला होता.

गुंतवणूक आणण्यात पुढाकार
कम्युनिस्ट पक्षांच्या डाव्या विचारसरणीतील परिवर्तनकारी नेते म्हणून भट्टाचार्य यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कारखानदारी सुरू केली. सिंगूर येथे टाटा नॅनो प्रकल्प उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नंदीग्राम येथे विशेष आर्थिक क्षेत्र उभारले. भट्टाचार्य यांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये आयटी आणि आयटी क्षेत्राशी निगडित मोठी गुंतवणूक आणण्यात त्यांना यश आले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने भट्टाचार्य यांचा एआय तंत्रज्ञान वापरून तयार केलेले व्हिडीओ मतदारांना दाखविला होता.