पशुवैद्यकीय सेवेसाठी 3 रुग्णवाहिका अन्‌‍ 4 नवे दवाखाने

0
28

>> पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची विधानसभेत माहिती; सुधारित मुख्यमंत्री कामधेनू योजनाही जाहीर

राज्यातील दूध उत्पादन वाढीसाठी सुधारित मुख्यमंत्री कामधेनू योजना जाहीर केली आहे. त्याशिवाय पशुवैद्यकीय सेवेसाठी 108 च्या धर्तीवर तीन रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहेत. तसेच नवीन चार पशुवैद्यकीय दवाखाने उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती पशुसंर्वधन आणि पशुवैद्यकीय तथा मत्स्योद्योग खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी विधानसभेत खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.

पशुवैद्यकीय सेवेची व्याप्ती वाढवण्यासाठी सांगे, चिखली, डिचोली, पेडणे येथे नवीन पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले जाणार आहेत. राज्यातील दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी सुधारित मुख्यमंत्री कामधेनू योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेखाली गुरांच्या खरेदीसाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीकडून खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला गायीचे छायाचित्र आणि इतर माहिती दिली जाणार आहे. या ठिकाणी गाय आणल्यानंतर दिलेल्या माहितीमध्ये फरक आढळून आल्यास गाय परत पाठविली जाणार आहे. राज्यातील दूध उत्पादन वाढीसाठी इतर अनेक योजना कार्यान्वित आहे. शेतकऱ्यांच्या दूध सबसिडीचा पाठपुरावा केला जात आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले.

पशुसंर्वधन खात्याने श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी दोन स्वयंसेवी संस्थांची निवड करण्यात आली आहे. श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी नागरिकांनी या संस्थांशी संपर्क साधण्याची गरज आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले.

राज्यात मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबविण्यात येत आहे. मच्छिमारांना मार्गदर्शनासाठी 36 सागरमित्रांची नियुक्ती केली आहे, असेही त्यांनी सांगितले. कारखान्यांमध्ये कंपनी नियमावलीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जात आहे. कंपन्यातील सुरक्षेबाबत सुमारे 573 कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

केवळ 35 ग्रामपंचायतींचा गोशाळांशी करार
राज्याच्या अनेक भागात मोकाट गुरांची समस्या भेडसावत आहे. मोकाट गुरांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायती यांनी गोशाळेशी सामंजस्य करार केला पाहिजे. त्यानंतर गोशाळेकडून त्या भागातील मोकाट गुरे ताब्यात घेतली जातात. राज्यातील केवळ 35 गपंचायती आणि 10 नगरपालिकांनी सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.

रुग्णवाहिकांसाठीची निविदा आज जारी होणार
राज्यात चोवीस तास पशुवैद्यकीय सेवेसाठी तीन रुग्णवाहिका कार्यान्वित केल्या जाणार आहेत. पशुवैद्यकीय रुग्णवाहिकेची निविदा शनिवार दि. 29 जुलै रोजी जारी केली जाणार आहे, असे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.