पवित्र नातं लग्नाचं!

0
386
  •  माधुरी रं.शे. उसगावकर
    (फोंडा)

कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचे सल्ले, अनुभवी बोल यावर नामी उपाय ठरतील. त्यांचा मौल्यवान अनुभव याविषयी निश्‍चितच कामी येईल. संकुचित दृष्टिकोन बदलून प्रेममायेचे नाते मनात अंकुरित होणे, त्यांना रोज ममत्वाचे पाणी देण्याने ते बहरते. असे बहरलेले कौटुंबिक नाते विवाह टिकविण्यात भरभक्कम मोलाची भूमिका बजावेल यात शंकाच नाही.

आसावरीताईंच्या मुलाचे लग्न थाटामाटात लागले. आसावरीताई व त्यांचे यजमान मुलाच्या लग्नात पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे होते. एवढ्यात त्यांच्या ओळखीचा एक गृहस्थ शुभेच्छा व्यक्त करण्यास आला. त्या दोघांनी सस्मित शुभेच्छा स्वीकारल्या. पण लगेच माधवीताईंनी त्या गृहस्थाच्या पत्नीच्या अनुपस्थितीविषयी विचारपूस केली. त्याने अळम् टळम् कारण देऊन पुढे बोलणं टाळलं आणि त्या गर्दीतून तो पुढे सरकला. आसावरीताईंच्या मनाला ते खटकलं पण त्यांनी ते त्यावेळी फारसे मनावर घेतले नाही. लग्न पार पडलं. आप्तेष्ट मंडळी आपापल्या घरी गेली. पण अधुनमधून त्या गृहस्थाचा विचार, त्याचं बोलणं आसावरीताईंच्या मनात रुंजी घालत होतं.
काही दिवसांनी आसावरीताईंना तिची मैत्रीण भेटली. लग्नसमारंभ छान झाला, लग्नात अमुक तमुक आली- गेली वगैरे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तेव्हा नकळत लग्नास आलेल्या त्या गृहस्थाचा विषय उपस्थित झाला. त्यावेळी चटकन तिची मैत्रीण त्यांना म्हणाली की तुला माहीत नाही का, त्यांच्या मुलीचा घटस्फोट झाला. काय तर म्हणे वाद-विवाद, मतभेदांवरून नवरा-नवरीचं पटेनासं झालं. दोन महिन्यांच्या अवधीतच दोन जिवांची ताटातूट. हे ऐकताच आसावरीताईंना त्या सद्गृहस्थाच्या बोलण्याचा छडा लागला. तिचं मन गलबललं. नकळत तिच्या मनात विचारांचं काहूर निर्माण झालं. मतभेदांच्या क्षुल्लक कारणास्तव लग्नाचं घटस्फोटात रुपांतर? हेच का संस्कारांचं जतन? की अधःपतन? अशाने लग्नाचं हे पवित्र बंधन टिकेल का? संस्काराची जडणघडण गेली कुठे? हीच का पूर्वापार संस्कार साधना?
खरोखर, विचार करण्यास उद्युक्त करणारी आसावरीताईंच्या मनात उपजलेली प्रश्‍नमालिका आहे. आजच्या नवपरिणित वधुवरांची गंभीर समस्या आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीत विवाह व कुटुंब याला मानाचे स्थान आहे, हे सर्वमान्य आहे. समाजाला विवाहपद्धतीचा प्रारंभ महर्षी मनूने केला असे वर्णित आहे. विवाहानंतर व्यक्तीचा ब्रह्मचर्याश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश होत असतो व नव्या कुटुंबाचा पाया घातला जातो.

नवदाम्पत्याने सर्वप्रथम घर स्थिर व आनंदी ठेवणे, घरातील रीतिरिवाजात मौलिक सहयोग देणे हे अलिखित पण जरुरीचे असते. समाजाचा मुख्य घटक म्हणजे कुटुंब. आपले कुटुंब तसेच घरातील व्यक्तींचा आदर राखणे, मिळून-मिसळून राहणे म्हणजेच घरातील व्यक्तींचे मन जिंकणे. मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे. पण दुसर्‍याचे मन जिंकता येणारे ‘मन’ ज्यांना जमतं तेच सफलतेने हा भवसागर पार करतात.
विवाहविधी हा पवित्र संस्कार मानला आहे. नोंदणी पद्धतीनेच विवाह न करता धर्मात सांगितलेल्या विधींनी युक्त विवाह केला जातो. वधू-वरांच्या मनावर कसे व कोणते संस्कार व्हावे हे विवाहसंस्कारातील प्रत्येक विधीत व प्रत्येक मंत्रात सांगितले आहे. ते वधू-वरांनी जाणून घेणे, त्यानुसार कृती करणे हितावह असते.

संस्कार म्हणजे सत्‌कृती किंवा चांगली कृती. संस्कारयुक्त कार्य असणे यात परंपरेचे जतन साहजिकच होते. मनाची संस्कारयुक्त कृती म्हणजेच सद्विचार व सद्बुद्धी.
सर्वसाधारणतः साखरपुड्यापासून विवाहविधी सुरू होतात. वराच्या व वधुच्या आईवडलांनी मुलगा व मुलगी यांच्या विवाहास संमती दिल्याचे वाङ्‌निश्‍चयात जाहीर करणे. विवाहाच्या दिवशी मंडपदेवता स्थापन, वाङ्‌निश्‍चय, गौरीहर पूजन, सीमांतपूजन, मंगलाष्टके, लग्न लावणे, कन्यादान, सप्तपदी वगेरे विविध विधींनी युक्त विवाह केला जातो. मंगलाष्टकात निरनिराळ्या देवदेवतांचे शुभाशीर्वाद मिळवून वरवधुंनी गृहस्थाश्रम पालन करण्यासाठी सतत दक्ष रहावे. त्यांचे सतत मंगल होवो, असे त्यांना शुभाशीर्वाद दिले जातात.
लग्न म्हणजे साहजिकच बंधन आले. बंधन हा शब्द अढी निर्माण करणारा वाटतो खरा परंतु लग्नविधीत सूत्रवेष्टन, कंकणबंधन, वस्त्रग्रंथीबंधन हे विधी असतात. यांचा अर्थ लग्नानंतर वधूवर कायमचे एकमेकांना बांधले आहेत. त्यांनी कायमचे एकमेकांच्या बंधनात पवित्र मनाने रहावे. वर वधुच्या गळ्यात विधीयुक्त मंगळसूत्र बांधतो.

सप्तपदी हासुद्धा अनेक विधींपैकी महत्त्वाचा विधी आहे. वराने वधूचा उजवा हात धरून तांदळाच्या सात राशींवरून तिला एकेक पाऊल चालवत नेणे या विधीस सप्तपदी म्हणतात. प्रत्येक पावलाला सप्तपदीचे मंत्रोच्चारण केले जाते. आपण एकमेकांशी समरस होऊन राहू. पहिले पाऊल विश्‍वासाने पडले की इतर सहा पावले सहज पडत जातात. त्यानंतर ती सप्तपदी ‘तप्तपदी’ होणार नाही याची दक्षता वधुवरांनी घ्यावी.
विवाह हा स्त्रीचा पुनर्जन्म असतो. तिला नवीन नाव ठेवले जाते(आता ही प्रथा ऐच्छिक होत आहे.) विवाहानंतर पतीपत्नींची कर्तव्ये एकमेकांनी समजून घेणे म्हणजे समजुतदारपणा असणे. मागील वादविवाद उकरून काढून भूतकाळात न जगता वर्तमानकाळात जगून जीवनाचा आनंद उपभोगावा. विवाहात दोन व्यक्तीच नव्हे तर दोन घराणी एकत्र येतात व कालांतराने समरस होतात. असे हे लग्नाचे बंधनयुक्त पवित्र नाते असते. यात दोन्ही घराण्याचा उत्कर्ष साधणे हा सुवर्णमध्य ठरतो.

लग्नाचं पवित्र नातं टिकवायचं तर मनानं पूर्ण सर्वस्वी समरसून जायचं असतं. सोळा संस्कार विधीत संस्कारित असा विवाह विधी टिकविण्यासाठी नाती खोलवर समजून घ्यावी. नाती जपताना मनाला जपावे. मनं जपण्यातच नात्याचा ओलावा टिकून राहतो.

विनाकारण अहंकाररूपी भूत नसावे. सांसारिक मानवात अहंकार असला तरी त्या अहंकारापासून नुकसान होऊ नये. नवर्‍याच्या अहंकाराला बायकोने जपावे. बायकोच्या भावनांना नवर्‍याने सांभाळावे. कुटुंबातील व्यक्तींशी मिळून मिसळून प्रेमाने वागावे. कुटुंबातील व्यक्तींनी माया-ममतेने समज द्यावा. ताणतणावामुळे नकारात्मक वृत्ती येते. जर मनाची वृत्ती सकारात्मक असेल तर आपण सृजनशील बनतो आणि जे करू त्यात यशस्वी होतो.

चुका घडल्या तर समजावून सांगाव्या व नंतर त्या चुका विसरून जाव्या. यात वाईट कुणाचंच नाही. दुमताने संसारात वादळ, झंझावात येतात तर एकमताने विचारांना जुळवता जुळवता नातं बहरतं. कधी कधी आपलं मत तरी स्थिर असतं का? आपलं मत क्षणोक्षणी बदलतं मग आपलंच बरोबर, आपणच श्रेष्ठ असा विचार करण्यानं काय साधेल? जेव्हा हे आपल्याला पटते की उणीवा आपल्यातही आहेत, तेव्हा ती व्यक्ती दुसर्‍यांमधील उणीवा सहज स्वीकारते. या जगरहाटीत कोणीही परिपूर्ण नाही. सद्विचारांच्या सत्‌कृतींच्या तालबद्धतेतून संसारात चैतन्यानंद साधायचा आहे. अंध करणार्‍या अहंकाराचे निर्मूलन म्हणजेच जीवन जागृती. ही जागृती होणे म्हणजेच सत्य उमगणे. माझ्यातला ‘मी’ गळून पडणे. अहंकार असा असावा की अहंकारातूनच माया ममतेचा पाझर फुटावा. सर्वांना संगे घेत आपुलकीचे नाते गुंफत या संसाररूपी जीवनाच्या वाटेवर चालावं, हसत हसत, आनंदानुभूतीचा अनुभव घेत.

सद्ययुगात मानवाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लग्नविधी संस्काराचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. या बाबतीत नवयुवकात जागृती करण्यासाठी समुपदेशन हीसुद्धा आज काळाची गरज आहे. जास्तीत जास्त संस्कारांचे महत्त्व पटविणे, कायद्यांचा फेरविचार करणे, काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी तडजोडीने समतोल साधून, मन जपून कौटुंबिक नाते टिकविण्याने लग्नसंस्कार टिकविण्यास सामान्य माणूसही हातभार लावू शकतो.

चांगले संस्कार केल्यास मूल सद्गुणी होईल, असे खात्रीपूर्वक सांगता येईल का? मनात भ्रम निर्माण होतो. आपले मूल संस्काराने निश्‍चितपणे पुढे चांगलेच वागेल असे सांगता येत नाही. परंतु आपले मूल तामसी वृत्तीचे असेल व त्याचे दैव म्हणजे नशीबही वाईट असेल तर आपण संस्कार केल्यास त्याची अधोगती निश्‍चितपणे काही प्रमाणात तरी रोखता येईल. याउलट मूल जर सात्विक प्रवृत्तीचे असेल व त्याला नशिबाची साथ असेल तर संस्कारांनी त्याची आध्यात्मिक उन्नती जलदगतीने होऊ शकेल.

आईवडलांनी मुलांवर योग्य संस्कार करणे, शिस्तपालन करणे हे वेळेअभावी कालबाह्य होत चालले आहे. तसेच अत्याधुनिक जीवनशैलीचे पडसादही मुख्यत्वे यास कारणीभूत ठरत आहेत. चौकोनी कुटुंबात मुलांचे नसते लाड व कोडकौतुक करण्यात मुलांत फाजील आत्मविश्‍वास निर्माण होतो. आपमतलबीपणा वाढतो. त्यामुळे पुढे ती एकांगी बनण्याची शक्यता जास्त असते. अशाने मुले बोकाळतात. अपेक्षापूर्ती झाली नाही तर औदासिन्याने, नैराश्याने ग्रासतात. ही टक्केवारी दिवसेंदिवस वाढते आहे. अशी लग्नाळू मुले यांच्याकडून लग्नबंधन टिकण्याची कशी अपेक्षा बाळगावी?
आमच्या जमान्यात एकत्र कुटुंबपद्धतीत संस्कारांची खाण बालवयापासूनच अनुभवायला मिळत असे. आज या बाबतीत पालकांची जबाबदारी वाढत आहे. सुजाण पालकांनो, वेळीच मुलांना संस्कारांचं बाळकडू पाजा. संस्कारांनी संस्कारयुक्त करण्यासाठी तुमचा सहवास मुलांना द्या. मुलांचे रोबोटीकरण होत आहे. याला वेळीच लगाम घालणे जरुरीचे आहे. अन्यथा गंभीर समस्येला सामोरे जाण्यावाचून पर्याय नाही.
याला कुठेतरी विराम मिळणे आवश्यक आहे. त्यावरच कुटुंबाचे सुख व समाजोन्नती अवलंबून आहे. याची जागृती आली तर या समस्येवरील हा तोडगा ठरेल. हे अशक्य बिलकुल नाही. थोडंफार आजच्या पाश्‍चात्त्याकडे झुकलेल्या जीवनशैलीमुळे अवघड असेलही परंतु शक्य आहे. आपल्या सकारात्मक विचारांवर व सतत तत्पर निर्णय, कृतींवर बहुतांशी अवलंबून आहे, असे माझे ठाम मत आहे. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचे सल्ले, अनुभवी बोल यावर नामी उपाय ठरतील. त्यांचा मौल्यवान अनुभव याविषयी निश्‍चितच कामी येईल.
संकुचित दृष्टिकोन बदलून प्रेममायेचे नाते मनात अंकुरित होणे, त्यांना रोज ममत्वाचे पाणी देण्याने ते बहरते. असे बहरलेले कौटुंबिक नाते विवाह टिकविण्यात भरभक्कम मोलाची भूमिका बजावेल यात शंकाच नाही. लग्न म्हणजे परिकथेतील स्वप्न नव्हे.

परवा परवाच व्हॉट्‌सऍप या अनुभवाच्या पोतडीवर वाचला. त्यातील मला भावलेले अल्पांश येथे समूद करावेसे वाटतात…..
कागदावर जुळलेली पत्रिका आणि
काळजावर जुळलेली पत्रिका
यात अंतर राहतं
हे स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं
तुला मिळणारा जीवन साथीदार अगदी
तुला हवा तसा असणार कसा
एकमेकांच्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळवून घेण्याची
सहनशीलता दोघांमध्ये हवी
आयुष्य जोडतं ठेवावं लागतं
हेच खरं वास्तव आहे…..