पवार पॉवर

0
23

‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मकथेच्या दुसऱ्या आवृत्तीच्या मुंबईतील प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा करून कार्यकर्त्यांवर जणू बॉम्बगोळाच टाकला. त्यांच्या या आकस्मिक घोषणेने हादरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या – कार्यकर्त्यांमध्ये मग त्यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी मनधरणी करण्याची अहमहमिकाच लागली. शेवटी हा निर्णय दोन तीन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. हे सगळे जे चालले होते ते प्रसारमाध्यमांच्या थेट प्रक्षेपणाखाली चालले होते. पवारांसारख्या चाणक्याचा बाप म्हणता येईल अशा राजकारण्याला आपल्या या घोषणेमुळे पक्षात हे सगळे घडेल याची अपेक्षा नव्हती, असे मानणे तद्दन भोळसटपणाचे ठरेल. पवार हे उडत्या पक्ष्यांची पिसे मोजणारे राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी अकस्मात हे राजीनामास्र का उपसले, ते जाहीर करण्यासाठी पुस्तक प्रकाशनासारखा जाहीर समारंभ का निवडला, या राजीनाम्याच्या घोषणेतून त्यांना नेमके काय साध्य करायचे होते हे सगळे प्रश्न उपस्थित झाले आहेत. जे घडले त्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसली ती म्हणजे त्यांचे पुतण्ये अजित पवार हे शरद पवारांनी देऊ केलेल्या राजीनाम्याच्या आणि पक्षनेत्यांची समिती नेमून नवा अध्यक्ष निवडण्याच्या पर्यायाच्या बाजूने होते, परंतु इतर बहुतेक सर्व नेत्यांचा आग्रह हा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष रहावे हाच होता. त्यामुळे या सगळ्या नाट्यात अजित पवार उघडे पडले. पवारांना नेमके तेच हवे होते का, पूर्वी शिवसेनेच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरेंनी केला होता, तसा पक्षाचा खुंटा हलवून बळकट करण्याचा हा प्रकार आहे का की पवारांवर या राजीनाम्यासाठी दबाव होता हा यातला कळीचा मुद्दा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून चालला आहे. नुकतेच त्याने आपले राष्ट्रीय पक्षाचे स्थानही गमावलेले आहे. भारतीय जनता पक्षाने त्याच्या एकेका नेत्याविरुद्ध केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून मोठी आघाडी उघडली आहे आणि काही काळापूर्वी तर खुद्द पवारांनाही ईडीचे समन्स गेले होते. छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलीक, हसन मुश्रीफ अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकेका नेत्याला भाजपने खडी फोडायला पाठवले. काल पवारांच्या प्रस्तावाचे समर्थन करणाऱ्या अजित पवारांना मात्र भाजपने आजवर सांभाळून घेतलेले दिसते. अर्थात, ते बधणार नसतील तर कारवाईची टांगती तलवार लटकवायला केंद्रीय यंत्रणा विसरलेल्या नाहीत. ते संचालक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखर कारखान्यांना ‘नाबार्ड’च्या दिशानिर्देशांविरुद्ध दिलेल्या कोट्यवधींच्या कर्जाचे प्रकरणच अजित पवारांना अडकवण्यास पुरेसे आहे. काल अजितदादांच्या बरोबरीने जे कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते, त्या प्रफुल्ल पटेलांची वरळीची संपत्ती नुकतीच ईडीने जप्त केलेली आहे. या सगळ्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एकनाथ शिंदेंच्या सोळा आमदारांविरुद्धची अपात्रता याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे असल्याने तेथे ते अपात्र ठरले तर आपले सरकार गमवावे लागू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत यावे असे जोरदार प्रयत्न गेले काही दिवस भाजपकडून चालले आहेत. अजित पवार चाळीस आमदारांच्या पाठिंब्यानिशी भाजपाला साथ देण्याच्या विचारात असल्याच्या वावड्या अमित शहांच्या मुंबई भेटीच्या पार्श्वभूमीवर उडाल्या होत्या. अजितदादांची भाजपसोबत जाण्यास हरकत नाही हे तर पूर्वीही त्यांच्या पहाटेच्या शपथविधीवेळी दिसलेच होते. त्यासाठी ते गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याचे वारंवार दिसतेच आहे. पेच आहे तो शरद पवारांपुढे. गेल्या 19 एप्रिलच्या अग्रलेखात आम्ही त्यावर सविस्तर लिहिले आहे. शरद पवार हा केवळ महाराष्ट्र विकास आघाडीचा आधारस्तंभ नाही. देशाच्या निधर्मी, ‘पुरोगामी’ म्हणवणाऱ्या राजकारणाचा आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे आपल्या पक्षावर भाजपसोबत जाण्याचा जर एवढा दबाव असेल, तर स्वतः अध्यक्षपद त्यागून अजितदादांच्या नेतृत्वाखाली अथवा कार्याध्यक्षपदाखाली पक्षाला ती मुभा देणे राजकीयदृष्ट्या पवारांसाठी सोयीचे आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेलाही धक्का लागणार नाही. याच दबावातून पवारांनी काल राष्ट्रीय अध्यक्षपदाचा त्याग करण्याचा प्रस्ताव मांडला होता का हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. पवारांसारख्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे हे सांगणे त्यांच्या निकटवर्तीयांंनाही कधी जमलेले नाही, परंतु पवारांसारखी व्यक्ती जेव्हा पक्षनेतृत्व त्यागण्याचा विचार बोलून दाखवते, तेव्हा त्यामागची कारणेही तेवढीच सबळ असतील हे निर्विवाद.