राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आधारवड श्रीमान शरद पवार नुकतेच गोव्याच्या दौर्यावर येऊन गेले. वास्तविक हा दौरा काही पक्षकार्यासाठी नव्हता. संसदेच्या संरक्षणविषयक समितीच्या बैठकीसाठी पवार आले होते. पक्ष कार्यालयाला भेट देणे मग ओघाने आलेच. त्यांचे तेथील स्वागत हा सोहळा झाला आणि त्या अनुषंगाने आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना पवारांनी आपल्या नेहमीच्या चाणाक्षपणे समर्पक उत्तरे दिली.
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत येथील समविचारी पक्षांशी युती करण्यासाठी आपला पक्ष तयार असल्याचे सूतोवाच जसे त्यांनी केले, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसची दारे पक्षप्रवेशासाठी सर्वांना खुली असल्याचे संकेतही या भेटीत दिले. खरे तर अद्याप विधानसभा निवडणुकीला दीड वर्ष तरी आहे. त्यामुळे पवारांसारखा मुरब्बी राजकारणी तर आपले सारे पत्ते एवढ्या लवकर खोलणे शक्यच नाही. त्यामुळे त्यांनी नुसती पुडी सोडून ठेवली आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा सामना करावा हा संदेश त्यांनी त्याद्वारे दिला आहे.
खरे म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला गोव्यात हरवण्याची बात करणे हा विनोद ठरतो, कारण मुळात भाजपविरोधात सर्व विरोधकांची आघाडी झाली तरी तिचे नेतृत्व करण्याइतपत बळ राष्ट्रवादीला गोव्यात आजवर कधीही लाभलेले नाही. तेवढी पक्षाची ताकदच कधी दिसलेली नाही आणि शिवाय पक्षाच्या एकमेव आमदाराने अगदी सुरवातीपासून येथील भाजप सरकारचीच साथसंगत केली आहे. आता राष्ट्रवादीचा हा भाजपला असलेला पाठिंबा ‘विषयाधारित’ असल्याची सारवासारव जरी पवारांनी केली असली, तरी अशा कोणत्या मुद्द्यांवर हा पाठिंबा आधारित आहे हे पक्षाने आजतागायत सांगितलेले नाही. सत्तेचे वाटेकरी होण्याचा हा निव्वळ लाचार प्रयत्न होता एवढेच. त्यामुळे खरोखर सर्व विरोधी पक्षांची आघाडी जर पवारांना करायची असेल तर सरकारसोबत राहिलेल्या आपल्या आमदाराला ती साथ सोडण्यास आधी सांगावे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला जर आगामी विधानसभा निवडणुकीत इतरांनी स्वतःकडे गांभीर्याने पाहावे असे वाटत असेल तर आधी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांना कसोशीने प्रयत्न करावे लागतील. संघटना बळकट करावी लागेल. आजवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने आपल्या गोव्याच्या शाखेकडे कधीही लक्षच पुरवलेले नाही. पक्षाचा विस्तार करण्याच्या दिशेने काही प्रयत्न झाल्याचेही कधी दिसून आलेले नाही. केवळ इतर पक्षांतून बाहेर पडणार्यांसाठी तात्पुरते आश्रयस्थान असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वरूप आजवर येथे बनून राहिले आहे. प्रदेशाध्यक्षपदी असलेले जुझे फिलीप डिसोझाही स्वतःचे राज्यव्यापी नेतृत्व निर्माण करू शकलेले नाहीत वा तसा त्यांनी प्रयत्न केल्याचेही कधी जाणवलेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसची दारे सर्वांसाठी खुली आहेत असे सांगतानाच पवारांनी ‘स्थानिक कार्यकारिणीचा त्या नावाला विरोध असता नये’ असी एक मेखही मारून ठेवली आहे.
शरद पवार या नावाचा करिष्मा वादातीत आहे. महाराष्ट्रामधील विद्यमान महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा गोवर्धन एकट्या पवारांच्या करंगळीच्या आधारावर टिकलेला आहे. परंतु त्यांचे हे मोठेपण कॉंग्रेसच्या डोळ्यांत नेहमीच सलत आलेले आहे. कॉंग्रेस पक्ष कधीही स्वतःकडे कमीपणा घेण्यास तयार नसतो आणि नेमका तेथेच माती खात असतो. गोव्यात जरी सर्व विरोधी पक्षांच्या आघाडीचे स्वप्न पवार पाहत असले तरी स्वतः अजूनही एकेकाळी हाती असलेल्या सत्तेच्या सुखस्वप्नांतच दंग असलेले कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व त्यांच्या हाकेला कितपत प्रतिसाद देईल, शिवसेनेप्रमाणे ‘मगो’ पक्ष ‘समविचारी’ च्या व्याख्येत बसणार का, विस्ताराची स्वप्ने पाहणारा गोवा फॉरवर्ड आणि ‘आप’ यात सहभाग घेणार का आणि पवारांची पॉवर गोव्यामध्ये कितपत चालेल याविषयी शंकाच आहे!