पर्वरी, धारबांदोडा येथे नवीन आयटीआय

0
146

राज्यात दोन नवी आयटीआय विद्यालये सुरू करण्यात येणार असून पर्वरी येथे अत्याधुनिक असे सर्वसुविधांनीयुक्त (स्टेट ऑफ आर्ट) असे आयटीआय विद्यालय सुरू करण्यात येणार असून त्यासाठी १२ हजार चौ. मीटर एवढी जमीन ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या धारबांदोडा तालुक्यातही एक आयटीआय विद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री दीपक ढवळीकर यांनी काल कारागीर प्रशिक्षण या खात्याच्या मागण्यांवर उत्तर देताना दिली.
आयटीआय उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना गुजरात मॉडेलच्या धर्तीवर उच्च शिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यात तो मॉडेल लागू करण्याबाबत अभ्यास करण्यात येणार असून गुजरात मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी एक शिष्टमंडळ गुजरात दौर्‍यावर जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कुशलता विकासावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून त्यासाठी आयटीआयमध्ये नवे अभ्यासक्रम सुरू केले जातील. तसेच सध्या जे अभ्यासक्रम आहेत ते आणखी चांगल्या पद्धतीने शिकवता यावेत व विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण देता यावे यासाठी आवश्यक ती नवी अवजारे खरेदी केली जातील, अशी माहितीही ढवळीकर यांनी यावेळी दिली.
आयटीआय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवण्यास रस घ्यावा यासाठी कंत्राटी पद्धतीवरील शिक्षकांना सेवेत कायम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आयटीआय इमारतींची दुरुस्ती करणार
राज्यातील आयटीआय विद्यालयाच्या इमारतींची स्थिती अत्यंत वाईट असून बर्‍याच इमारतींना गळती लागलेली आहे. वास्को, म्हापसा आदी ठिकाणच्या इमारती तर मोडकळीस आलेल्या आहेत. या इमारतींची दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खाते व गोवा साधनसुविधा विकास महामंडळ यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.