>> व्हॉट्सॲप ग्रुपवर प्राप्त तक्रारींचे संबंधित खात्यांकडून होणार निराकरण
पर्वरी येथील उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक आणि व्हॉट्सॲप ग्रुप लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला काल दिली. त्यानंतर, राज्य सरकारने 8380081177 हा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला. या व्हॉट्सॲप क्रमांकावर पर्वरी उड्डाण पुलाशी संबंधित अडी-अडचणी, सूचना, तक्रारी केल्या जाऊ शकतात, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल ॲड. देविदास पांगम यांनी दिली.
पर्वरी उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. नागरिक या ग्रुपवर 50 शब्दांच्या आत आपल्या समस्या मांडू शकतात. या ग्रुपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारी सरकारच्या चार-पाच खात्यांना पाठविल्या जाणार असून, संबंधित खात्याकडून समस्या दूर करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती पांगम यांनी दिली.
पर्वरी येथील रहिवाशांनी संबंधित जनहित याचिकेत सांडपाणी आणि गटार व्यवस्थेची हानी केल्याचा मुद्दा उपस्थित करून हस्तक्षेप अर्ज देखील दाखल केला आहे. गटार व्यवस्थेची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात पाणी साचून पुराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम खाते आणि कंत्राटदाराला आगामी पावसाळ्यापूर्वी सांडपाणी आणि गटार व्यवस्थेची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून चार आठवड्यात गटार दुरुस्तीबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे.
पर्वरीत ह्युंडाई शोरूमजवळील 50 ते 60 मीटरच्या रस्त्याचे दुरुस्ती काम जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने रखडले आहे. सदर जलवाहिनीचे इतरत्र स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर त्या 50 ते 60 मीटर रस्त्याचे व्हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण केले जाणार आहे. या भागाच्या डांबरीकरणाबाबत येत्या सोमवार दि. 13 रोजी कंत्राटदाराकडून उच्च न्यायालयाला माहिती दिली जाणार आहे, असेही ॲड. पांगम यांनी सांगितले.