>> मंदिर तोडल्याने नागरिक व भाविक संतप्त
>> विरोधकांची जोरदार टीका
>> मंदिर उभारण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
पर्वरी येथे उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरत असलेले अंदाजे दोनशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड व त्याखाली असलेले खाप्रेश्वर या राखणदाराचे घुमटीवजा मंदिर काल रविवारी या उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने हटवल्यानंतर पर्वरीत अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले. काल रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून कंत्राटदाराच्या उपस्थितीत राखणदार देवस्थानाजवळील वडाच्या झाडाची छाटणी करण्याचे काम सुरू झाल्यानंतर मंदिराचे भाविक तसेच पर्यावरणवादी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या लोकांनी कंत्राटदार तसेच तेथे पहाऱ्यासाठी असलेल्या पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे परिसरातील वातावरण तंग बनले.
यावेळी मंदिराचे भाविक व पर्यावरणवादी यापैकी काहीजणांनी या कृतीबद्दल संताप व्यक्त केला. हिंदू धर्माचे रक्षक म्हणणारे सत्ताधारी हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले खाप्रेश्वर देवाचे मंदिर कसे मोडून टाकत आहेत, असा सवालही यावेळी काहीजणांनी केला.
मंदिर हटवण्यात येत असल्याचे पाहून यावेळी काही भाविकांच्या भावना अनावर झाल्या. विशेष करून महिला भाविकांच्या डोळ्यांत अश्रूही आले.
यावेळी कंत्राटदाराने सगळे काही न्यायालयाच्या आदेशानुसार केले जात असल्याचे स्पष्ट केले. मात्र, भाविकांनी त्याला आक्षेप घेताना न्यायालयाने वडाचे झाड स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते. मंदिराच्या स्थलांतराबद्दल कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी देवस्थान समितीने मंदिराच्या स्थलांतरास विरोध केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आदी मोठ्या संख्येने जमले होते.
वटवृक्षाचे स्थलांतर तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. पण त्याचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.
सदर कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराच्या उपस्थितीत वटवृक्षाची छाटणी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झाली. यावेळी वडासोबत खाप्रेश्वर मंदिराचा भाग तोडण्याच्या कामास सुरुवात झाली असता तेथील ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी उपस्थित कंत्राटदार आणि पोलिसांशी हुज्जत घातली.
उच्च न्यायालयाची संमती
मागील महिन्याच्या बुधवारी (दि. 19 फेब्रुवारी) उच्च न्यायालयाने सदर वडाच्या झाडाबाबत याचिका निकालात काढत उड्डाणपुलाच्या कामासाठी वडाचे स्थलांतर करून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास संमती दर्शवली होती. तसेच स्थलांतरासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. श्री देव खाप्रेश्वर ही त्या ठिकाणची स्थळदेवता असून स्थानिकांनी वडाच्या स्थलांतराला आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान सरकारने वडाच्या स्थलांतरासाठी तज्ज्ञांच्या शिफारशी आणि उपाययोजना सादर केल्या होत्या. त्या न्यायालयाने मान्य करून स्थलांतरासाठी परवानगी दिली होती.
विरोधी पक्षांच्या नेत्यांची टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन सुरू असलेल्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केले. यावेळी नेत्यांनी सरकारवर टीकेचा हल्ला केला. यावेळी बोलताना पाटकर यांनी, हिंदुत्ववादी संघटना आता गप्प का आहेत? मंदिर हटवण्यास कायदेशीर आदेश देण्यात आला आहे काय, असा सवाल केला.
केवळ झाडाच्या स्थलांतरास न्यायालयाची परवानगी
उच्च न्यायालयाने केवळ वडाच्या झाड स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते. मंदिराचा विषय वेगळा असून त्याच्या स्थलांतराबद्दल कोणताही निर्णय झालेला नव्हता. तरीही काल सकाळी कंत्राटदाराने देवस्थानच्या भागाला हात घातल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. खाप्रेश्वर हा देव गावचा राखणदार म्हणून ग्रामस्थांची श्रद्धा आहे. पर्वरीच्या राखणदाराला हात घातल्यामुळे स्थानिक हवालदिल झाले आहेत आणि देवस्थान समितीने याला विरोध केला आहे. यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत बोलताना पर्वरी येथील खाप्रेश्वर मंदिर जरी वडाकडून हटवले असले तरी ते मंदिर ज्या ठिकाणी सदर वटवृक्षाचे स्थलांतर करण्यात येणार आहे त्या जागी उभारण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आहे. काल सकाळी पर्वरी येथील पुरातन वटवृक्ष आणि तेथील खाप्रेश्वराचे मंदिर हटवल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.