पर्वरीत लवकरच आंबेडकर भवन उभारणार

0
14

>> मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; पणजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

पर्वरी येथे आंबेडकर भवन उभारण्यासाठी समाज कल्याण खात्याकडे जमीन सुपूर्द करण्यात आली असून, भवन बांधण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

समाज कल्याण संचालनालयाने पणजीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. आंबेडकर यांचा जातीवाद, सामाजिक विषमतेला विरोध होता. डॉ. आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीत आणि सामाजिक उन्नतीसाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. आपण सर्वांनी डॉ. आंबेडकरांची सामाजिक मूल्ये आणि विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकार डॉ. आंबेडकर यांची विचारधारा घेऊन पुढे जाणार आहे. सरकारच्या मागासवर्गीय नागरिकांसाठीच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. सरकारी योजनांपासून मागासवर्गीय वंचित राहू नये, यासाठी लक्ष दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर यांचे राष्ट्राप्रति दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. तसेच त्यांचे कार्य चांगला आणि सुसंवादी समाज घडविण्यासाठी नवीन पिढीला मार्ग दाखवेल, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

डॉ. आंबेडकरांचे कार्य केवळ दलितांच्या उन्नतीपुरते मर्यादित नाही तर त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र, कृषी, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रातील प्रमुख धोरणांचा प्रचार करून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे योगदान दिले आहे, असे प्रमुख वक्ते गिरीश मोर यांनी सांगितले. या कार्यक्रमात समाजकार्य करणार्‍या चंद्रकांत हळर्णकर, लक्ष्मण गावकर, नारायण खोर्जुवेकर, नरसिंह परवार, दिलीप पेडणेकर यांचा डॉ. आंबेडकर सामाजिक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.