पर्वरीत मद्यधुंद जीपचालकाने घेतला दिव्यांग व्यक्तीचा बळी

0
16

पर्वरीतील राष्ट्रीय महामार्गावरील एका सुपर मार्केटसमोर मद्यधुंद थार जीपचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका दिव्यांग व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. काल पहाटे 5 वाजता ही घटना घडली. कित्तू बेहरा (51, रा. म्हापसा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून अपघातांची मालिका सुरू झाली असून, ती अद्याप चालू आहे.
पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 16) पहाटे 5 वाजता पणजीकडे जाणाऱ्या थार जीपने (क्र. जीए-03-झेड-6188) सुपर मार्केटसमोर कित्तू बेहरा यांच्या दुचाकीला (क्र. जीए-03-एसी-8829) मागून जोरदार धडक दिली. त्या धडकेबरोबर ते खाली कोसळून जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच जीपचालक नरेश जैन (41, रा. वसई-महाराष्ट्र) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गोमेकॉमध्ये वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने मद्यपान केले असल्याचे आढळले. सहाय्यक उपनिरीक्षक संजीव साळुंखे यांनी अपघाताचा पंचनामा केला. निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.