पर्वरीत एटीएम मशीन फोडून १९ लाख लुटले

0
294

पर्वरी येथील आंबिर्ण, सुकूरमधील युनियन बँकेचे एटीएम मशीन चोरांनी उचलून नेऊन १९ लाख ३८ हजार रुपयांची रोख रक्कम लुटण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि. १७ रोजी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी सुकूर येथील चर्चसमोर असलेल्या एटीएम गाळ्यामधील मशीनच उचलून नजीकच्या झुडुपात नेले. तेथे ते फोडले व आतील रोख रक्कम काढून मशीन तेथेच टाकून त्यांनी पलायन केले.

रात्रीनंतर त्याठिकाणी वर्दळ कमी असल्याने ते एटीएम मशीन वाहनाद्वारे दूर नेऊन ते झुडुपात फोडून आतील रक्कम लुटण्यात आली.

यासंबंधी शाखा व्यवस्थापक प्रभावती हेगडे यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी मशीनमध्ये रोख १९ लाख ३८ हजार रुपये होते व ते चोरट्यांनी पळवले असल्याचे सांगितले. गाळ्यामधून मशीन काढून ते जीए ०३ एन ८०६५ या वाहनातून दूर ठिकाणी नेण्यात आले व तेथे फोडण्यात आले. घटनास्थळी उपनिरीक्षक विश्वेश भट पोलीस पथकासमवेत जाऊन पंचनामा केला. यावेळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.

चोरांनी मशीन काढण्यापूर्वी तेथील सीसी टीव्ही जोडण्या काढल्या होत्या असे पोलिसांनी सांगितले. निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.